

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले असल्याचा दावा मंगळवारी आघाडीच्या नेत्यांनी केला असला, तरी अजून 33 जागांवर वाद सुरू असल्याने बुधवारी आघाडीच्या तीन प्रमुख पक्षांचे 85/85/85 असे 270 जागांचे वाटप पूर्ण झाले असल्याची घोषणा ‘मविआ’च्या नेत्यांनी बुधवारी येथे संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईतील काही जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये वाद शमला असल्याचे चित्र मंगळवारी आघाडीच्या नेत्यांनी रंगविले. त्यामुळे काँग्रेस 105, ठाकरे गट 95 आणि शरद पवार गट 85 जागा लढविणार असल्याचा फॉर्म्युला स्पष्ट केला होता. वास्तवात, विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवर वाद कायम होता. त्या जागांचा वाद सोडविण्यासाठी बाळासाहेब थोरात, अनिल देसाई आणि जयंत पाटील यांची बुधवारी दुपारी बैठक झाली. त्यातही तोडगा निघाला नाही. त्यामुळे शरद पवार यांच्याकडे या जागांचा वाद नेण्यात आला. पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ही बैठक झाली.
आघाडीचे जागावाटप जाहीर होण्यापूर्वी ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात काही काँग्रेस आणि शेकापने दावा केलेल्या जागा आहेत, असा आक्षेप पटोले यांनी घेतला. हा वाद पवार यांनी शमवला. त्या बैठकीत पवारांनी आघाडीच्या नेत्यांना फैलावर घेतले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी जागांचा वाद तुम्हाला सोडवता आलेला नाही. ‘मविआ’ला जागांचा वाद सोडवता आलेला नाही, असे चित्र जनतेत निर्माण झाले आहे. त्यामुळे बहुतांश जागांचे वाटप झाल्याचे आधी माध्यमांना जाऊन सांगा, असे पवारांनी बजावले तेव्हा संजय राऊत, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई, जयंत पाटील या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.
शरद पवार यांच्यासोबत आमची बैठक झाली. जागावाटप सुरळीत पार पडले आहे. काँग्रेस 85, ठाकरे गट 85 आणि शरद पवार गट 85 असे 270 जागांचे वाटप ठरले आहे. शेकाप, समाजवादी पक्ष, डावे पक्ष यांनाही आम्हाला सोबत घ्यायचे आहे. त्यामुळे उरलेल्या जागांबाबत या मित्रपक्षांशी गुरुवारपासून चर्चा सुरू होईल, असे खा. राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच, ठाकरे गटाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत काही वादाच्या जागा असल्याचे निदर्शनाला आणून दिले असता, ते चुकून झाले आहे. आम्ही यादीत दुरुस्ती करू. या जागांवर चर्चेतून मार्ग काढू, असे त्यांनी नमूद केले.
आघाडीने 270 जागांचे वाटप पूर्ण केले आहे. उर्वरित 18 जागांबाबत मित्रपक्षांशी चर्चा करण्यात येईल. आघाडी एकत्रितरीत्या विधानसभा निवडणुकीस सामोरे जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले. त्यांनीही 270 जागांचे वाटप पूर्ण केले असल्याचे सांगितले. यावरून ‘मविआ’चे नेते गोंधळलेले दिसले. विशेष म्हणजे, कोणत्या जागांवर वाद आहे? यासारख्या प्रश्नांना बगल देऊन आघाडीचे नेते पत्रकार परिषदेतून उठून गेले.
85/85/85 असे आघाडीतील तीन पक्षांचे 270 जागांचे वाटप झाले असल्याचे संजय राऊत यांनी जाहीर केले. प्रत्यक्षात 85+85+85=255 अशी बेरीज होते. त्याकडे साफ दुर्लक्ष करून राऊत यांनी 270 जागांचे वाटप झाल्याचे ठोकून दिले. त्यामुळे आघाडीचे नेते चक्रावून गेल्याचे दिसून आले.