रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात दोन प्रतिस्पर्धी निश्चित झाले आहेत. शिवसेना (शिंदे गट) कडून विद्यमान आमदार उदय सामंत विरुद्ध बाळ माने शिवसेना (उद्धव ठाकरे) अशी लढत पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ही जुनीच लढाई नव्याने जोमात पहायला मिळणार आहे. जुन्या लढतीत नव्या डावपेचाने लक्षवेधी ठरणार आहे.
जिल्ह्यात पाचही मतदारसंघापैकी सर्वात हायहोल्टेज लढत ही रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात पहायला मिळणार आहे. जुने प्रतिस्पर्धी पुन्हा नव्याने जोमाने लढण्यास तयार झाले आहेत. यावेळी मात्र पक्ष बदल असणार आहे. विद्यमान आमदार व मंत्री उदय सामंत यांच्याविरुद्ध माजी आमदार बाळ माने हे असणार आहे. सन २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपचे तत्कलिन विद्यमान आमदार बाळ माने विरुद्ध राष्ट्रवादी युवक नेते उदय सामंत अशी लढत झाली होती. मात्र या लढततीत उदय सामंत यांनी बाजी मारत गेली 20 वर्षे या मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली आहे. सलग चारवेळा ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र इतकाच फरक होता २००४ ला राष्ट्रवादी, २००४ ला राष्ट्रवादी, मात्र २०१४ ला शिवसेना, २०१९ ला शिवसेना असा प्रवास सामंत यांचा आहे. मात्र दोन वर्षांपूर्वी राज्यात घडलेल्या राजकीय सत्तांतरानंतर ते शिंदे गटात दाखल झाले. सध्या ते महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर झाले आहेत.
दुसर्या बाजूला भाजपमध्ये 39 वर्षे कार्यरत असलेले माजी आमदार बाळ माने यांनी अनपेक्षितपणे बुधवारी उबाठामध्ये जाहीर प्रवेश केला. यानंतर लगेचच त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. यामुळे आता विद्यमान आमदार विरुद्ध माजी आमदार अशी लढत होणार आहे. दोघेही जुनेच प्रतिस्पर्धी असल्याने आता नवीन डावपेचाला सुरुवात होणार आहे. गेली 3 टर्म बाळ माने विरुद्ध उदय सामंत अशी लढत पहायला मिळत आहे. यामुळे यावेळची निवडणुक पुन्हा एकदा लक्षवेधी ठरणार आहे. कारण बाळ माने तसेच उदय सामंत यांनी पक्ष बदलल्याने मैदान तेच मात्र नवी विठी, नवा दांडू अशी स्थिती पहायला मिळणार आहे.
खेड-दापोली विधानसभा मतदार संघातून शिंदे गटाकडून (महायुती) विद्यमान आमदार योगेश कदम यांचे नाव जाहीर झाले आहे. त्यांच्या विरोधात माजी आमदार संजय कदम हे असणार आहेत. संजय कदम हे पूर्वीचे राष्ट्रवादीचे परंतु वर्षभरापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला होता. या विधानसभा मतदार संघातसुद्धा आजी-माजी अशी लढत पहायला मिळणार आहे.