

लातूर, पुढारी वृतसेवा : लातूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी त्यांच्या वाहन ताफ्यात तीनपेक्षा अधिक वाहने नसतील तसेच निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या १०० मीटरच्या परिसरात व दालनात पाच व्यक्तीला प्रवेश असेल. नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळी कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक सभा घेणे, घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणने आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध असेल.
याशिवाय जिल्हाभर कोणत्याही वाहनाच्या ताफ्यामध्ये दहापेक्षा जास्त मोटारगाड्या वापरण्यास अथवा वाहने निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवरांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, निवडणुकीच्यासंबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊटस, होडौंग्ज, कमानी लावण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. याशिवाय निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तीगत जागा, इमारत, आवार, भिंतीवर संबंधित जागा मालक व संबंधित परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय प्रचारासाठी वापर करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व शासकीय व सर्व निमशासकीय कार्यालयाच्या परिसरामध्ये उपोषण, मोर्चा, निदर्शन, घेराव, आंदोलने करण्यास मनाई करण्यात आली आहे. सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय ऑटोरिक्षा, टेम्पो, सायकल रिक्षा, सायकल व इतर वाहनांवर पक्षाचे बोधचिन्ह, झेंडे व इतर घोषवाक्य लिहिणे आदींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. हे आदेश दिनांक १५ ऑक्टोबर, २०२४ पासून ते दिनांक २५ नोव्हेंबर, २०२४ पर्यंत अंमलात राहणार आहेत.