कुर्ला इमारतीच्या आगीनंतर हमालांनी केली चौथ्या मजल्यावरून महिलेची सुटका

कुर्ला इमारतीच्या आगीनंतर हमालांनी केली चौथ्या मजल्यावरून महिलेची सुटका

कुर्ला; पुढारी वृत्तसेवा : कुर्ला आणि चेंबूर यांच्या मध्यावर असलेल्या नवीन टिळकनगर रेल व्हीव इमारतीला शनिवारी (दि. ८) भीषण आग लागली होती. या आगीच्या झालेल्या प्रचंड धुरामुळे या ठिकाणी खिडकीतून बाहेर आलेल्या नागरिकांना शेकडो फूट उंचावरून वाचविण्याचा थरार पाहायला मिळाला. या इमारतीमध्ये कचरा टाकण्यास असलेल्या डकमध्ये प्रथम आग लागली आणि ही आग इमारती च्या बाराव्या मजल्यापर्यंत पोहोचली.

जिथे जिथे डकचे तोंड उघडलेले आहे, त्या सर्व मजल्यावर धूर आणि आगीचे डोम उसळले. प्रचंड धुरात नागरिक भयभीत झाले. काही कुटुंब इमारती मधून बाहेर येण्याऐवजी घरातील खिडकीत येऊन उभे राहिले. तर शायना शेख नावाची ५६ वर्षीय महिला चौथ्या मजल्यावर असलेल्या घराच्या खिडकीच्या बाहेर असलेल्या अरुंद जागेवर उतरली. भीतीने आणि प्रचंड धुरामुळे ती कोणत्याही क्षणी उडी मारेल, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, समोरच लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये हमालीचे काम करणारे गुड्डू निषाद, रवी धुरंदर, सतीश सिंग आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आले. टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे आणि इतर अधिकारी देखील येथे यावेळी दाखल झाले.

पोलीस आणि या हमालांनी खिडक्यांच्या ग्रीलवर चढून या महिलेला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले, गुड्डू, रवी आणि सतीश हे चार मजल्यापर्यंत ग्रील च्या सहायाने वर चढून गेले आणि शायना यांच्यापर्यंत पोहोचले. पोलिसांनी त्यांना एक दोरी दिली. तिच्या मदतीने त्यांनी शायना यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आणि ते यात यशस्वी झाले. शायना यांना शांत करून त्यांना या तिघांनी तिथेच बसवून ठेवले. काही वेळाने या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि त्यांनी या महिलेला खिडकीतून आत घेतले आणि त्यांचा जीव वाचला.

इमारतीमध्ये अडकून पडलेले सुमारे ३३ रहिवाशांना ही अग्निशमन दलाच्या जवानानी सुरक्षित बाहेर काढले. हा सगळा थरार सुमारे एक तास सुरू होता. अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यावर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही. मात्र, सचिन आंद्रे (३१), अंजनी आंद्रे (२६), मीना आंद्रे (५२) कैलास आंद्रे (५६), रचना मालवणकर (३४), दिशा कोटक (२५) या नागरिकांना श्वास घेण्यात त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची तब्येत स्थिर आहे. घटनेची माहिती मिळताच माजी महापौर किशोरी पेडणेकर, स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी नागरिकांची विचारपूस केली. या आगीत खऱ्या अर्थाने हिरो ठरलेल्या त्या हमलांचे मात्र, सर्वांनी कौतुक केले आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news