

Another setback for Thackeray group in North Mumbai? Former corporator Tejashwi Ghosalkar resigns
मुंबई : प्रकाश साबळे
उत्तर मुंबईतील ठाकरे कुटुंबासोबत वैयक्तीक संबंध असणाऱ्या विनोद घोसाळकर कुटुंबांतील सुन तथा माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. स्थानिक नेतृत्वावरील नाराजीतून हा राजीनामा दिला गेल्याचे म्हटले जात आहे. आज दुपारी शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या भेटीनंतर त्या मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिवसेना उबाठा नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर आता त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी हे मोठे पाऊल उचलले आहे. फेसबुक लाईव्ह सुरु असताना अभिषेक घोसाळकर यांची मॉरीस नरोन्हाने हत्या केली होती. या हत्यानंतर मुख्य आरोपीला पोलीसांनी अद्यापही अटक केलेली नाही.
तेजस्वी घोसाळकर शिवसेना उबाठा नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. तसेच शिवसेना उबाठामधील ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. यामुळे त्यांना पक्षात घेण्यासाठी शिंदे गट आणि भाजपा सक्रीय झाला आहे. तर दुसरीकडे दिवंगत अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेवर संचालक पदावर होते, यामुळे त्या भाजपमध्ये जातात की, शिंदे गट शिवसेनेत सामील होतात, याकडे दोन्ही पक्षाचे लक्ष लागून राहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्वी घोसाळकर यांनी व्हॉट्सअपद्वारे विभागप्रमुखांकडे राजीनामा सादर केला आहे. दरम्यान, शिवसेनेचे वरिष्ठ नेते तेजस्वी घोसाळकर यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज त्या उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असून यानंतर पुढचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तेजस्वी घोसाळकर यांनी दिलेल्या राजीनाम्यात म्हटले की, मी तेजस्वी घोसाळकर महिला दहिसर विधानसभा प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), या पदावरून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे. या पदावर कार्य करताना मला पक्षाच्या कार्यपद्धतीशी एकनिष्ठ राहून कार्य करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी पक्षप्रमुख व आपले मन:पूर्वक आभार मानते. माझा हा राजीनामा स्वीकारावा, ही नम्र विनंती.