

Thackeray Brothers Alliance
मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या भावांची युती होणे अशक्य आहे. ही युती होणार म्हणून सुरू असलेली चर्चा मीडियामध्येच असून मीडियाच या युतीसाठी उत्सुक असल्याचे दिसते, असे धक्कादायक विधान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एका लग्नसमारंभात पत्रकारांशी बोलताना केले. मनसेचीच भूमिका देशपांडे यांनी बोलून दाखवली असेल तर ठाकरे बंधूंच्या युतीची शक्यता मनसेकडूनच संपुष्टात आली असे म्हटले जात आहे.
या लग्नसमारंभाला उपस्थित असलेले ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू व मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनी मात्र बोलणे टाळले. ठाकरे बंधूंच्या युतीची शक्यता खुद्द संदीप देशपांडे फेटाळून लावत असताना त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया नोंदवली नाही.
सध्या ठाकरे बंधू मिलनाची जोरदार चर्चा आहे. दोन ठाकरे एकत्र येण्यासाठी ठाकरे कुटुंबातील सदस्यांसह मनसे ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचेही प्रयत्न सुरू आहेत. पण या युतीसाठी अद्यापपर्यंत ठाकरे बंधूंचे एकमत झाले नसल्याचे समजते. मनसेचे ज्येष्ठ नेते संदीप देशपांडे यांनीही युती अशक्य असल्याचे सांगत, ठाकरेंच्या युतीच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. आता जोपर्यंत मातोश्री किंवा शिवतीर्थमधून कुणी ठाकरे युतीसंदर्भात अधिकृत भाष्य करत नाही तोपर्यंत या संदर्भातील चर्चांना अर्थ नाही, असेच देशपांडे यांच्या विधानाचा अर्थ काढला जात आहे.
ठाकरे बंधूंचे मिलन व त्यानंतर होणाऱ्या युतीमध्ये काँग्रेसची मोठी अडसर निर्माण होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन निवडणूक लढवली, तर या युतीमध्ये काँग्रेसला घेऊ नये अशी अट मनसेकडून टाकण्याची शक्यता आहे. काँग्रेस सोबत युती करून मनसे पालिकेची निवडणूक लढवण्यास तयार नसल्याचे त्यांच्याच काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पण यावर उघडपणे बोलण्यास कोणीही तयार नाही.
दुभंगलेले ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मते ठाकरे बंधूकडे वळण्याची दाट शक्यता आहे. याचा फटका मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपला बसू शकतो. त्यामुळे भाजप शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांना विशेषतः मुंबईतील पदाधिकाऱ्यांना ठाकरे बंधूंचे मिलन नको आहे. पण सध्या तरी भाजपाच्या नेत्यांनी ठाकरेंच्या मिलनाबाबत आपले तोंड बंद ठेवले आहे.