

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाने यंदाच्या शैक्षणिक वर्षातील बीबीए, बीएमएस, बीबीएम, एमबीए, बीसीए, एमसीए (इंटिग्रेटेड) या अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली असून आता विद्यार्थ्यांना २६ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. या अभ्यासक्रमांसाठी ५४ हजार ७२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेशासाठीचा प्रतिसाद वाढला आहे.
बीबीए, बीएमएस, बीबीएम आणि एमबीए (इंटिग्रेटेड) या अभ्यासक्रमांसाठी ३२ हजार ७६३, तर बीसीए आणि एमसीए (इंटिग्रेटेड) अभ्यासक्रमांसाठी २१ हजार ९६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे एकूण नोंदणीचा आकडा ५४ हजार ७२६ वर पोहोचला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये या अभ्यासक्रमांसाठी ४४ हजार ४८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामुळे यंदा आतापर्यंतच सुमारे १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे.
या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला ६ जुलैपासून सुरुवात झाली होती. प्रारंभीची अंतिम मुदत १६ जुलै होती. त्यानंतर २० जुलैपर्यंत पहिली मुदतवाढ देण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून आता दुसऱ्यांदा मुदतवाढ देत अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ जुलै निश्चित करण्यात आली आहे.
यंदापासून पीसीएम आणि पीसीबी गटाची एमएचटी-सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांनाही बीबीए, बीएमएस, बीबीएम आणि बीसीए अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनीही प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊन नोंदणी करण्याचे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.
प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत. तसेच ई-स्क्रूटिनी किंवा फिजिकल स्क्रूटिनी या दोनपैकी एका पडताळणी पद्धतीची निवड करावी. ई-स्क्रूटिनीची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पडताळले जाणार असल्याने त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही.