

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या ५०८ किमीच्या मार्गिकेवर स्थापत्य बांधकाम आणि रेल्वे रूळ टाकण्याच्या कामांना वेग येत असताना, विद्युतीकरणाच्या कामांनाही गती मिळत आहे. या मार्गिकेवर प्रगत २ बाय २५ केव्ही ओव्हरहेड ट्रॅक्शन प्रणाली बसविण्यात येत आहे. ही उच्च-गती रेल्वेसाठी जगभरात वापरल्या जाणाऱ्या सर्वात अत्याधुनिक रेल्वे विद्युतीकरण तंत्रज्ञानांपैकी एक आहे.
हे तंत्रज्ञान भारतात प्रथमच लागू करण्यात येत असून, ३२० प्रतिकिमी प्रतितासापर्यंत अतिउच्च वेगाने धावणाऱ्या गाड्यांसाठी आवश्यक असलेला स्थिर आणि अखंड वीजपुरवठा करण्यासाठी ते विशेषतः विकसित करण्यात आले आहे. राष्ट्रीय वीज ग्रीडमधून वीजपुरवठा विशेषतः डिझाइन केलेल्या ग्रीड उपकेंद्रापर्यंत आणि त्यानंतर मार्गिकेवर विशिष्ट ठिकाणी उभारण्यात आलेल्या १४ ट्रॅक्शन उपकेंद्रापर्यंत पोहोचविला जाईल.
यापैकी ५ ट्रॅक्शन उपकेंद्रे महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, विरार, बोईसर आणि ठाणे डेपो येथे असून, उर्वरित ९ गुजरातमध्ये वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, महेमदाबाद, अहमदाबाद आणि साबरमती डेपो येथे आहेत. ही उपकेंद्रे मार्गिकेच्या विविध विभागांना वीजपुरवठा करतील. त्यामुळे बुलेट ट्रेन एका विभागातून दुसऱ्या विभागात जात असताना वीजपुरवठ्यातील बदल कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरळीतपणे होईल आणि प्रवाशांना त्याची जाणीवही होणार नाही.
अखंड वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार बिघाड झालेल्या भागांना त्वरित विलग करण्यासाठी मार्गिकेवर ३१ स्विचिंग पोस्ट्स उभारण्यात येणार आहेत. बुलेट ट्रेनला वीजपुरवठा करण्याव्यतिरिक्त, स्थानके, सिग्नलिंग प्रणाली, देखभाल सुविधा आणि इतर कार्यात्मक पायाभूत सुविधांसाठी वीज उपलब्ध करून देण्यासाठी १६ वितरण उपकेंद्रांची उभारणी करण्यात येत आहे.