

मुंबई: मुंबईत घडवण्यात येणाऱ्या बाप्पाच्या उंच मूर्तींना अन्य राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मोठी पसंती दिसून येत आहे. यामध्ये कर्नाटकमधील हैदराबाद, गुजरात राज्यातील सुरत, बडोदा, अहमदाबाद, मध्य प्रदेश व राजस्थानमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे मुंबईतून मूर्ती घेऊन जातात. दरवर्षी या मूर्तींमध्ये १० ते १५ मूर्तींची वाढ होते. यंदा २ हजार पेक्षा जास्त उंच मूर्ती परराज्यात जाणार आहेत.
मुंबईतील उंच मूर्तींची परराज्यातील गणेशोत्सव मंडळांना अक्षरश: भुरळ पडली आहे. परळ येथील कारखान्यातून ४० पेक्षा जास्त मूर्ती या बाहेरील राज्यात जातात. यात केवळ उंचच मूर्ती नसून घरगुती मूर्तींचाही समावेश असल्याचे मूर्तीकार सिद्धेश दिघोळे यांनी सांगितले.
लालबागचा राजा साकारणारे मूर्तीकार संतोष कांबळी यांच्याकडून सात ते आठ मोठ्या गणेश मूर्ती गुजरात व कर्नाटक राज्यात जातात. तर परळ, लालबागसह सर्व उपनगरातील विविध गणेश कारखान्यातून प्रत्येक मूर्तिकारही १० ते १५ मूर्ती परराज्यात पाठवतो. यंदाही मोठ्या प्रमाणात मूर्तींची ऑर्डर देण्यात आल्याचे मूर्तिकारांकडून सांगण्यात आले.
बैठ्या मूर्तींना सर्वाधिक पसंती
परराज्यामध्ये गणेश मूर्तीची वाहतूक करताना, मोठी जोखीम असते. त्यामुळे बहुतांश गणेशोत्सव मंडळ बैठ्या मुर्त्यांना पसंती देतात. या मूर्तीं ट्रकमधून सहज नेता येतात. मुंबईपासून जवळपास राहणारे मात्र विविध आकाराच्या मूर्ती नेत असल्याचे मूर्तीकारांनी सांगितले.