

मुंबई: विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वेकडून रविवार ( ३० ऑगस्ट ) रोजी उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक विद्याविहार आणि ठाणे दरम्यानच्या ५ व्या व ६ व्या मार्गावर आणि ठाणे व वाशी/नेरुळ दरम्यानच्या अप व डाऊन मार्गांवर असणार आहे.
मध्य रेल्वे मार्गात विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान ५ व्या आणि ६ व्या मार्गावर सकाळी ८.०० ते दुपारी १.३० या वेळेत हा मेगा ब्लॉक असणार आहे. यामुळे डाऊन मेल आणि एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत.
आणि ठाणे स्थानकावर पुन्हा ५ व्या मार्गावर वळवल्या जातील. तसेच अप मेल आणि एक्सप्रेस गाड्या ठाणे स्थानकावर अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जाणाऱ्या गाड्या विद्याविहार स्थानकावर सहाव्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या ब्लॉक कालावधीत नियोजित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिरा धावणार आहेत.
ट्रान्स हार्बरवरील सेवा रद्द
ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाईनवर सकाळी ११.१० ते सायंकाळी १६.१० वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत ठाणे आणि वाशी/नेरुळ/पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाईनवरील सेवा बंद राहतील.
सकाळी १०.३५ ते सायंकाळी १६.०७ वाजेपर्यंत ठाणे येथून वाशी/ नेरुळ/ पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर सेवा रद्द राहणार आहेत. सकाळी १०.२५ ते सायंकाळी १६.०९ वाजेपर्यंत पनवेल/ नेरुळ/ वाशी येथून ठाणे येथे येणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर सेवा रद्द राहतील.