

मुंबई: देशभरात लागू करण्यात आलेल्या २० टक्के इथेनॉल मिश्रित ई २० पेट्रोलमधील भेसळ, पाण्याचे प्रमाण आणि वाहनांचे इंजिन निकामी करणाऱ्या घटकांवर केंद्र सरकारने धडक कारवाई सुरू केली आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने देशभरात राबवलेल्या व्यापक तपासणी मोहिमेनंतर मानकांचे उल्लंघन करणाऱ्या २,५७३ पेट्रोल पंपांवर पेट्रोल विक्री थांबवली आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांमध्ये 'इंडियन ऑईल'च्या सर्वाधिक १,२५७ पंपांचा समावेश असून हिंदुस्तान पेट्रोलियमचे ९१५ आणि भारत पेट्रोलियमचे ४०१ पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहेत.
इथेनॉल विरोधात आवाज उठल्यानंतर सुरुवातीला एचपी या कंपनीने आपल्या पेट्रोल पंपांवर टेस्टिंग केल्याचा दावा केला होता. यामध्ये पेट्रोलमध्ये काहीच समस्या नसल्याचे म्हटले होते.
या धडक कारवाईची ठिणगी ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स’च्या एका पत्राने पडली. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि महिंद्रा यांनी २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून गोळा केलेल्या २५० हून अधिक इंधन नमुन्यांची गुप्तपणे तपासणी केली होती.
या तपासणी अहवालात ई २० पेट्रोलमध्ये क्लोराईड व पाण्याचे प्रमाण सरकारी मर्यादेपेक्षा धक्कादायक पटीने जास्त असल्याचे उघड झाले. चौकशीत समोर आल्यानंतर ग्राहकांचा असंतोष आणि वाहन कंपन्यांची चिंता लक्षात घेऊन मंत्रालयाने ही पावले उचलली आहेत.
वाहनांच्या इंजिनवर थेट आघात; अवघ्या २०० किमीमध्ये धोका
इंधनातील ऑरगॅनिक क्लोराईड हे अत्यंत गंज चढवणारे रासायनिक द्रव्य असते. आधुनिक गाड्यांमधील प्रिसिजन फ्युएल इंजेक्टर्स केवळ १ ते ३ पीपीएम पातळी सहन करू शकतात. जास्त क्लोराईडमुळे इंधनाची रासायनिक रचना आम्लीय बनते, ज्यामुळे फ्युएल लाईन्स, इंजेक्टर्स, फ्युएल पंप आणि एक्झॉस्ट सिस्टीम खराब होते.
महिंद्राच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अंतर्गत ई-मेलमध्ये इशारा दिला होता की, अशा क्लोराईडयुक्त पेट्रोलमुळे अवघ्या २०० किलोमीटरच्या प्रवासातही गाडीची फ्युएल सिस्टीम पूर्णपणे निकामी होऊ शकते.
८९ हजार पंपांवर दिवसातून १२ वेळा तपासणी
ग्राहकांचा विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी आणि पुरवठा साखळी शुद्ध ठेवण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. ८८ हजार ९९५ पेट्रोल पंपांवरील भूमिगत टाक्यांमध्ये दररोज ८ ते १२ वेळा पाण्याचे प्रमाण तपासणे अनिवार्य केले आहे. ८४,६८७ जुन्या पंपांचे ऑडिट पूर्ण झाले असून पावसात टाक्यांची सुरक्षितता तपासली जात आहे. इथेनॉल वाहून नेणाऱ्या टँकर्सवर ७,२९६ सल्फर टेस्ट आणि १,०७९ क्लोराईड टेस्ट करण्यात आल्या.
क्लोराईडची धोकादायक पातळी
पेट्रोलियम मंत्रालयाच्या नियमानुसार पेट्रोलमध्ये क्लोराईडचे प्रमाण जास्तीत जास्त ३ पीपीएम असणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्ष तपासणीत हे आकडे भयानक आढळले. राजस्थान : ६ ते ५७० पीपीएम (मान्य १९० पट जास्त), मध्य प्रदेश : ४.१ ते ५५० पीपीएम, दिल्ली-एनसीआर : १.४ ते ४२० पीपीएम, महाराष्ट्र : १० ते ३५७ पीपीएम, आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेश : पाण्याचे प्रमाण ३,००० पीपीएमच्या मर्यादेच्या तुलनेत थेट १२,५०० ते १३,००० पीपीएमपर्यंत आढळले.