

नवी मुंबई : देशभरात स्वच्छतेच्या बाबतीत वेगळी ओळख निर्माण केलेल्या नवी मुंबई महापालिकेने यंदाच्या स्वच्छ भारत अभियान 2025-26 साठी कंबर कसली असून संपूर्ण यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आली आहे. सलग आठ वर्षे राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार पटकावणाऱ्या महापालिकेचा गतवर्षी ‘सुपर स्वच्छ लीग’ या विशेष गटात समावेश झाला आहे. यंदाही हा मान कायम राखत देशात अव्वल क्रमांक मिळवण्याच्या उद्देशाने प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे.
केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाच्या स्वच्छ सर्वेक्षणासाठी येणारे पथक मे महिन्यात शहराची पाहणी करणार आहे. या पार्श्वभूमीवर अधिकारी व कर्मचारी पूर्ण क्षमतेने कामाला लागले असून शहरभर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. नवी मुंबईने यापूर्वीही स्वच्छ सर्वेक्षणात देशातील पहिल्या दहा शहरांत स्थान मिळवले असून राज्यात अव्वल क्रमांक कायम राखला आहे.
यंदा आता सुपर स्वच्छ लीग या विशेष गटातील क्रमांक टिकवण्याचा निर्धार मनपाने केला आहे. त्यासाठी प्रमुख रस्ते, भिंती यांची रंगरंगोटी, सुशोभीकरण तसेच विद्युत रोषणाई केली जात आहे. कचरा वेळेत उचलला जावा यासाठी विशेष पथके नियुक्त केली असून पहाटेपासूनच स्वच्छतेची कामे सुरू होत आहेत. प्रत्येक विभागात स्वतंत्रपणे स्वच्छता मोहिमा राबवून परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यावर भर दिला जात आहे.
केंद्रीय पथकाच्या पाहणीपूर्वी शहर अधिक सुबक दिसावे यासाठी सर्व विभाग सतर्क झाले असून नागरिकांनाही या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्रीय पथक येणार आहे. महापालिकेकडून वर्षभर स्वच्छतेवर भर दिला जातो. यंदाही उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
डॉ. अजय गडदे, उपायुक्त, नवी मुंबई महापालिका