

मुंबई: राजधानी दिल्लीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. या अधिवेशात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून घेण्याची तयारी केली आहे. त्याला विरोध करण्यासाठी इंडिया आघाडीने दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे.
मात्र या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या उपस्थित राहणार नाहीत.
३० नोव्हेंबर रोजी लोकसभेचे तर ३ डिसेंबर रोजी राज्यसभेचे अधिवेशन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजधानी दिल्लीतील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीनेही शनिवारी तातडीची बैठक बोलावली आहे.
पण या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती नसणार आहे.शरद पवार आजारी असल्याने सुप्रिया सुळे या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, असे त्यांच्या निकटवर्तीयांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मात्र, पक्षाच्या वतीने इतर खासदार या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. लोकसभेच्या विशेष अधिवेशनासाठी सुप्रिया सुळे थेट रविवारी रात्री दिल्लीत पोहोचतील, असे समजते.
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष इंडिया आघाडीपेक्षा वेगळी भूमिका घेऊ शकतो अशी चर्चा आहे. पवारांची राष्ट्रवादी भाजपाला या विधेयकावर पाठिंबा देईल किंवा प्रसंगी गैरहजर राहील, असा तर्क लावला जात आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
दुसरीकडे, आठ खासदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने सर्व खासदारांना ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान सभागृहात अनिवार्यपणे उपस्थित राहण्यासाठी ‘व्हिप’ बजावला आहे. सर्व राज्यांत समान ५० टक्के जागावाढ झाल्यास पाठिंब्याचा विचार करू, असे संकेत कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी दिले आहेत.
एप्रिलमध्ये या विधेयकाला विरोध करणाऱ्या या पक्षाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच सुप्रिया सुळेंनी इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारल्यास विरोधी पक्षांच्या एकजुटीला मोठा धक्का बसेल आणि इंडिया आघाडीतील फुटीवर शिक्कामोर्तब होईल, अस मानले जाते.