

मुंबई: शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्या पक्षात विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नव्हता आणि त्यावर चर्चा झाली असती तर अजित पवारांनी ती आम्हाला सांगितली असती, अशी भूमिका घेणाऱ्या अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आता विलीनीकरणास अनुकूल भूमिका घेतली आहे.
अजित पवार आणि शरद पवार गटाच्या नेत्यांची विलीनीकरणावर चर्चा झाल्याचे मान्य करीत अजित पवारांनी आपल्याला विलीनीकरणाची तारीख सांगितली होती, असा नवा दावा आता त्यांनी केला आहे.
विलीनीकरणाचा अध्याय बंद
अजित पवारांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. आता सुनेत्रा पवार आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा झाल्या आहेत; दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनीही विलीनीकरणाची शक्यता फेटाळून लावली आहे. आमचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.
त्यावेळी १० नोव्हेंबरच्या भेटीबाबत काही चर्चा झाली. मात्र, विलीनीकरणाचा अध्याय आता कायमचा बंद झाला आहे. पण, जर आज अजित पवार हयात असते, तर १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण झाले असते. कारण स्वतः अजित पवार यांनीच मला ही तारीख सांगितली होती, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
विलीनीकरणावर चर्चा नाही : प्रफुल्ल पटेल
शरद पवार यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची भेट घेतली. या भेटीत राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची कोणतीही चर्चा झाली नाही, असा खुलासा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.
दोघांच्या चर्चेत १० तारखेनंतर भेटू हा जो उल्लेख आला आणि त्याबाबतची क्लिप व्हायरल झाली, त्यावरून विलीनीकरणावर १० तारखेनंतर चर्चा होणार आहे का, असा तर्क लावला गेला. तो चुकीचा आहे.
सध्या दिवाळीचे दिवस आहेत. दिवाळी संपल्यानंतर १० तारखेनंतर आपण भेटू या, असे आम्ही म्हणालो. त्यात राजकीय चर्चेला विषय नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले