Ajit Pawar plane crash | अजित पवारांच्या विमानाचा कॅप्टन ऐनवेळी बदलला

मित्र वाहतूक कोंडीत अडकल्याने सुमीत कपूर यांनी केले विमानाचे सारथ्य
Ajit Pawar plane crash
Ajit Pawar plane crash | अजित पवारांच्या विमानाचा कॅप्टन ऐनवेळी बदललाPudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला, त्या दिवशी पायलट सुमीत कपूर यांची ड्युटीच नव्हती. त्यांचा मित्र वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे विमान कंपनीने सुमीत यांना ड्युटीवर जाण्याचे आदेश दिले, अशी माहिती समोर आली आहे.

विमानाचे सारथ्य कॅप्टन सुमीत यांनी केले खरे; पण त्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला आणि त्यात अजित पवार यांच्यासह पाचजणांचा मृत्यू झाला. गुरुवारी सुमीत यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात दिल्लीतील पंजाबी बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

अजित पवार यांना मुंबईहून बारामतीला घेऊन जाणार्‍या विमानाचा वैमानिक वाहतूक कोंडीत अडकला होता. यामुळे अपघाताच्या काही तास आधी सुमीत यांना आदेश मिळाला की, त्यांना अजित पवार यांना मुंबईहून बारामतीपर्यंत एका निवडणूक रॅलीसाठी घेऊन जायचे आहे. सुमीत हे वरिष्ठ आणि अनुभवी वैमानिक होते. त्यांना सुमारे 20 हजार तास उड्डाणाचा अनुभव होता. दरम्यान, बारामतीतील विमान अपघातानंतर, हातात घातलेल्या ब्रेसलेटमुळे सुमीत यांच्या मृतदेहाची ओळख पटली. त्यांच्या पश्चात पत्नी, वृद्ध वडील, मुलगा शिव आणि मुलगी सान्या असा परिवार आहे.

1990 च्या दशकात ते सहारा एअरलाईन्समध्ये रुजू झाले. नंतर त्यांनी जेट एअरवेजमध्ये सेवा दिली. त्यांचे काम इतके बिनचूक होते की, त्यांना बोईंग 737 चे परीक्षक (एक्झामिनर) म्हणून नियुक्त करण्यात आले. परीक्षक होणे हे नागरी विमान वाहतुकीतील मोठे यश मानले जाते. हे खूप वरिष्ठ पद आहे. परीक्षक म्हणून सुमीत इतर वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी आणि कार्यक्षमतेसाठी जबाबदार होते. ते गेल्या पाच वर्षांपासून व्हेंचर एव्हिएशनसोबत काम करत होते. सुमीत यांच्या कुटुंबाची मुळे उत्तर प्रदेशातील मुरादाबादशी जोडलेली आहेत. तथापि, ते दिल्लीत राहत होते. लोक त्यांना प्रेमाने ‘बनी’ म्हणत असत. शेजार्‍यांनी सांगितले की, त्यांनी ‘बनी’ला एका चंचल मुलापासून अनुभवी कॅप्टन बनताना पाहिले होते.

एकीकडे मरण, दुसरीकडे तोरण

सुमीत यांचा मुलगा आणि जावई हेदेखील पायलट आहेत. हे कुटुंब लवकरच त्यांच्या नवीन घरात स्थलांतरित होण्याची तयारी करत होते. त्याआधीच सुमीत यांनी कायमसाठी जगाचा निरोप घेतला. फेब्रुवारीत सुमीत यांच्या मुलाचे लग्न होणार होते. कुटुंब लग्नाच्या तयारीमध्ये मग्न होते. विशेष म्हणजे, यंदाच्या एप्रिलमध्ये सुमीत हे 63 व्या वर्षात पदार्पण करणार होते. येत्या दोन-तीन वर्षांत निवृत्त होऊन समाधानी जीवन जगणार, असे ते अलीकडे वारंवार बोलून दाखवत होते. तथापि, त्यांच्या अकाली एक्झिटमुळे त्यांचे कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news