Technical Education: तंत्रशिक्षणाची क्रेझ, आयटीआयकडे पाठ; पॉलिटेक्निकच्या पहिल्याच फेरीत जोरदार प्रतिसाद

आयटीआयच्या दोन फेऱ्यांनंतरही ४३ टक्क्यांपेक्षा कमी प्रवेश
Admission
AdmissionPudhari
Published on
Updated on

मुंबई: दहावीनंतरच्या करिअरची दिशा ठरविताना राज्यातील विद्यार्थ्यांनी यंदाही तंत्रशिक्षणालाच पसंतीचा कौल दिला आहे. पॉलिटेक्निकच्या पहिल्याच प्रवेश फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तर आयटीआयच्या दोन प्रवेश फेऱ्या पूर्ण होऊनही ४३ टक्क्यांपेक्षा कमी प्रवेश झाल्याने कौशल्याधारित अभ्यासक्रमांपेक्षा तंत्रनिकेतन पदविका (डिप्लोमा) शिक्षणाकडेच विद्यार्थ्यांचा वाढता कल असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील ४४२ तंत्रनिकेतन संस्थांमध्ये १ लाख ३७ हजार ६२७ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी अंतिम गुणवत्ता यादीत १ लाख ४० हजार ३७१ विद्यार्थी पात्र ठरले, तर १ लाख २१ हजार ८३१ विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीसाठी पर्याय भरले.

पहिल्या फेरीत ८९ हजार ६३१ विद्यार्थ्यांना जागा वाटप करण्यात आल्या. त्यापैकी ५८ हजार ३६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून, आणखी १९ हजार ६१९ विद्यार्थ्यांनी 'बेटरमेंट'चा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे पहिल्याच फेरीत रिपोर्टिंगचे प्रमाण ८७ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

दुसरीकडे, आयटीआय प्रवेशासाठी १ लाख ६५ हजार ३७४ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केला होता. मात्र, दोन प्रवेश फेऱ्या पूर्ण होऊनही प्रतिसाद अपेक्षेइतका मिळालेला नाही. १ लाख ४५ हजार १२४ जागांपैकी केवळ ६२ हजार ७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून ८३ हजार ४८ जागा अद्याप रिक्त आहेत.

आयटीआयच्या पहिल्या फेरीत ७८ हजार ४९६ विद्यार्थ्यांना जागा वाटप झाले होते. त्यापैकी ४१ हजार ८२५ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला. या फेरीतील प्रवेशाचे प्रमाण ५३.२८ टक्के राहिले. दुसऱ्या फेरीत ४४ हजार ६८० विद्यार्थ्यांना जागा वाटप झाले; मात्र १९ हजार ७८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने प्रवेशाचे प्रमाण ४४.२९ टक्क्यांवर घसरले. दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही एकूण प्रवेशाचे प्रमाण ४२.७७ टक्क्यांवरच राहिल्याने आयटीआय अभ्यासक्रमांना अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Admission
B Pharm New Syllabus: बी. फार्म अभ्यासक्रमात आता एआय, मशीन लर्निंग; फार्मसी शिक्षणात मोठा बदल

याउलट, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम म्हणून ओळख असलेल्या आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा ओढा तुलनेने कमी झाल्याचे यंदाच्या प्रवेश प्रक्रियेतील आकडेवारीवरून दिसून येत आहे. नवी दिल्लीतील प्रशिक्षण महासंचालनालयाच्या (डीजीटी) मार्गदर्शक सूचनांनुसार आयटीआयमधील विद्यार्थ्यांना किमान २४० तासांचे उद्योगसुसंगत अल्पकालीन प्रशिक्षण देण्याची जबाबदारी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयावर आहे.

मात्र प्रत्यक्षात कौशल्य प्रशिक्षणापेक्षा विविध प्रशासकीय उपक्रम व जयंती, स्वच्छता मोहिमा अशा सरकारदरबारी असलेल्या इतर उपक्रमांवर विद्यार्थ्यांचा वेळ जात आहे. यामुळे प्रशिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.

Admission
Bribery Case: जवानांची वैध देयके मंजूर करण्यासाठी लाच

या अभ्यासक्रमांचे आकर्षण वाढले

तंत्रनिकेतन पदविकानंतर थेट अभियांत्रिकी पदवीच्या द्वितीय वर्षात प्रवेशाची संधी, उच्च शिक्षणाचे अधिक पर्याय, शिष्यवृत्ती, कॅम्पस प्लेसमेंट, उद्योगांमधील इंटर्नशिप तसेच एआय, आयटी, ऑटोमेशनसारखे अद्ययावत अभ्यासक्रम यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा कल पदविका अभ्यासक्रमांकडे वाढत आहे.

याशिवाय राज्यातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे, उद्योगाभिमुख तांत्रिक शिक्षण मिळावे, यासाठी विविध तंत्रनिकेतनमध्ये 'सेंटर ऑफ एक्सलन्स' उभारण्यात आल्यानेही या अभ्यासक्रमांचे आकर्षण वाढले आहे. गेल्या चार वर्षातील आकडेवारीचा आलेख पाहता पदविका अभ्यासक्रमांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news