

मुंबई: राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची अचूक नोंद आणि उपस्थितीची खात्री करण्यासाठी शिक्षण विभागाने ‘पटपडताळणी’ मोहिमेला वेग दिला असून 11, 15 आणि 22 एप्रिल 2026 या तीन टप्प्यांत ही प्रक्रिया राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये इयत्ता दुसरी ते नववी आणि अकरावीच्या वर्गांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यातील शाळांमध्ये आधीच परीक्षा काळाचा ताण असताना आता ‘पटपडताळणी’चे नवे ओझे शिक्षकांच्या खांद्यावर टाकण्यात आले आहे. आधार-आधारित नोंदी, अपार आयडी आणि यूडायस प्लससारख्या प्रणाली अस्तित्वात असतानाही विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती मोजण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाने दिल्याने शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
31 मार्च 2026 रोजी जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार, राज्यातील शाळांमध्ये विविध इयत्तांतील विद्यार्थ्यांची पटपडताळणी विशिष्ट तारखांना करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ही पडताळणी परीक्षा काळातच करण्याचे नियोजन असल्याने शिक्षकांची मोठी कोंडी झाली आहे. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा सुरू असताना मराठी, इंग्रजी आणि विज्ञान विषयांच्या दिवशीच पटपडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
इयत्ता पहिली ते आठवीसाठीही 11, 15 आणि 22 एप्रिल या कालावधीत पडताळणी करण्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. या काळातच संबंधित इयत्तांच्या परीक्षा देखील आयोजित करण्यात येत असल्याने शिक्षकांवर दुहेरी जबाबदारी येणार आहे.
इयत्ता नववीसाठी पूर्व-प्रगत चाचणी (पॅट) च्या दिवशीही पटपडताळणी करण्याचे आदेश आहेत. म्हणजेच, विद्यार्थ्यांच्या परीक्षांसोबतच उपस्थिती तपासण्याचे अतिरिक्त काम शिक्षकांना करावे लागणार आहे. शासनाने या प्रक्रियेसाठी स्वतंत्र पोर्टलवर मुख्याध्यापक, क्लस्टर हेड, बीईओ आणि शिक्षणाधिकारी यांना लॉगिनची सुविधा दिली असली, तरी प्रत्यक्षात शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवण्याची जबाबदारी शिक्षकांवरच टाकण्यात आली आहे.
शिक्षक संघटनांकडून या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आधार, अपार आणि यूडायस प्लसद्वारे आधीच विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती शासनाकडे उपलब्ध आहे. तरीही पुन्हा प्रत्यक्ष पटपडताळणीची सक्ती करणे म्हणजे शिक्षकांवर अनावश्यक कामाचा बोजा टाकणे आहे, असे एका शिक्षकाने सांगितले.
पटपडताळणीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागासोबतच जिल्हा परिषदेच्या इतर विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मदत घेण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. यासाठी संबंधित जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली आहे. शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी आणि शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची पटपडताळणीही 11, 15 आणि 22 एप्रिल रोजी करण्यात येहणार आहे. या कालावधीत अनेक शाळांमधील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपून त्यांना सुट्या लागलेल्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन सुटीच्या कालावधीत शाळेमध्ये उपस्थित राहावे लागेल.