Mumbai Metro Expansion: महामुंबईचे मेट्रोमार्ग झाले 100 किमीचे

मेट्रो-2 ब आणि मेट्रो-9चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
Mumbai Metro Expansion
Mumbai Metro ExpansionPudhari
Published on
Updated on

मुंबई: मेट्रो-2ब मार्गिकेचा पहिला टप्पा डायमंड गार्डन ते मंडाळे आणि मेट्रो-9 मार्गिकेचा पहिला टप्पा दहिसर ते काशिगाव यांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाले. यामुळे आज बुधवारपासून महामुंबई क्षेत्रात एकूण 100 किमीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित झाले आहेत.

दहिसर ते डीएननगर मेट्रो-2 अ मार्गिका 18.6 किमीची आहे. अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो-7 मार्गिका 16.5 किमीची आहे. या दोन्ही मार्गिका 2022-23 पासून सुरू आहेत. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो-1 मार्गिका 11.40 किमी असून ती 2014 पासून प्रवासी सेवेत आहे. तसेच ऑक्टोबर 2024 पासून टप्प्याटप्प्याने 33.5 किमीची मेट्रो-3 भुयारी मार्गिका सुरू करण्यात आली.

Mumbai Metro Expansion
Mumbai advertisement license fee verdict|जाहिरात परवाना शुल्कवाढीचा पालिकेला अधिकार: हायकोर्ट

नवी मुंबई मेट्रो-1 मार्गिकेचा बेलापूर ते पेंढार हा 11.1 किमीचा टप्पा नोव्हेंबर 2023 साली सुरू झाली. यात आता आणखी दोन मेट्रो मार्गिकांची भर पडली आहे. आज बुधवारपासून दहिसर ते काशिगाव 4.7 किमी मार्गावर मेट्रो-9 आणि डायमंड गार्डन ते मंडाळे 5.6 किमी मार्गावर मेट्रो-2 ब सुरू होत आहे. त्यामुळे संपूर्ण महामुंबईत सध्या कार्यान्वित असलेल्या मेट्रो मार्गिकांची एकूण लांबी 101.4 किमीवर पोहोचली आहे.

वांद्रे-बीकेसी-कुर्ला मार्गावरील पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजन

मुंबईतील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने वांद्रे-बीकेसी-कुर्ला या मार्गावर पॉड टॅक्सी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पाची एकूण लांबी 8.85 किमी असून एकूण 22 स्थानके आहेत. 3.36 किमीच्या पहिल्या टप्प्यात कुर्ला, एलबीएस मार्ग, एमएमआरडीए पे अँड पार्क (जी ब्लॉक), बीडीबी गेट-11, वांद्रे (पूर्व), कलानगर, जुनी एमएमआरडीए इमारत, उत्पादन शुल्क विभाग ही स्थानके आहेत.

एआयवर आधारित, चालकविरहित ऑपरेटिंग तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. प्रत्येक पॉडमध्ये 6 प्रवासी प्रवास करू शकतात आणि ते पूर्णपणे स्वयंचलित असून बॅटरीच्या ऊर्जेवर धावते. हे पॉड्स जास्तीत जास्त 40 किमी प्रतितास वेगाने धावतात आणि केवळ 15 सेकंदांच्या अंतराने प्रवास करतात. 2031 पर्यंत पूर्ण प्रकल्प कार्यान्वित होईल व दररोज 1 लाख प्रवाशांना सेवा देईल.

Mumbai Metro Expansion
Maratha Empire Map: 'एनसीईआरटी'च्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला

ऑरेंज गेट व मुलुंड बोगद्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे पूर्वमुक्त मार्गावरील कोंडी कमी होईल. वांद्रे सागरी सेतू ते बीकेसीपर्यंत आणि तेथून पुढे सीएसएमटी आणि विमानतळापर्यंत बोगदा बांधून तो पुढे सागरी किनारा मार्गाला जोडला जाणार आहे. उत्तर-दक्षिण जोडणीसाठी किनारी मार्ग आणि पूर्व-पश्चिम जोडणीसाठी बोगदा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून संपूर्ण महामुंबईला अखंड जोडणी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news