

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबईतील सेंट जॉर्जेस रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मे २०२२ ते जुलै २०२५ या तीन वर्षांत ५२१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या कालावधीत अतिदक्षता विभागातील अनेक रुग्णांनी (७.८ टक्के) उपचार पूर्ण न करताच डिस्चार्ज घेतला, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सुधारण्याकरीता विधान परिषदेत आमदार उमा खापरे यांनी तारांकित प्रश्न मांडला होता. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात मंत्री मुश्रीफ यांनी माहिती दिली आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील डॉक्टर हे उपस्थित राहत असून तेथील आरोग्य यंत्रणा सुरळीत सुरू आहे.
अतिदक्षता विभागात सहाय्यक प्राध्यापकांच्या (औषधवैद्यकशास्त्र) देखरेखीखाली आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक इंटर्न यांची नियुक्ती केलेली असते. मात्र रुग्णांच्या उपचारांबाबत निर्णय घेण्याची त्यांना मुभा नसते, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.
दर सहा महिन्यांनी डेथ ऑडिट
रुग्णालयातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी संस्थास्तरावर विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या सूचनांनुसार अतिदक्षता विभागात सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई अतिरिक्त सहाय्यक प्राध्यापक (भूलतज्ज्ञ) नेमण्यात आले असून आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
तसेच, रुग्णालयातील बायोमेडिकल वेस्टचे व्यवस्थापन, संसर्ग नियंत्रण आणि देखरेख व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून मृत्यूचे स्वतंत्र वर्गीकरण केले जात आहे. याशिवाय दर सहा महिन्यांनी डेथ ऑडिट करण्यात येत असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे.