मुंबई : एसटी महामंडळाच्या ताफ्यात आतापर्यंत 641 इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या असून बसेसच्या संख्येत अपेक्षित वाढ होत नसली, तरी संथ गतीने का होईना, वाढ होत आहे. मात्र जसजशा बसेस दाखल होतील, त्या प्रमाणात तोटाही वाढत असून तोट्याचा व्यवहार्यतापूरक निधी देण्यात क्लिष्टता निर्माण झाली आहे. याचे तांत्रिक कारण देत सरकारने निधी देण्यास नकारघंटा वाजवून एसटीला शॉक दिल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
तोट्याची रक्कम एसटीला देण्यात यावी, असा ठराव राज्य परिवहन मंडळाच्या संचालक मंडळाच्या जुलै 23 मध्ये झालेल्या बैठकीत पारित करण्यात आला असून सदरची रक्कम सरकारने एसटीला द्यावी अशी विनंती ठरावाद्वारे करण्यात आली होती. मात्र सदर ठरावाच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली नसून मंजुरीशिवाय हा निधी देता येणार नाही, असा तांत्रिक मुद्दा शासनाने उपस्थित केला आहे. त्यामुळे हा निधी आता बुडेल का, अशी शंका निर्माण झाली आहे, असेही श्रीरंग बरगे यांनी सांगितले.