

मुंबई : मुंबई शहरात सुरु असलेली सोन्याची तस्करी, तस्करीमार्गे मिळविलेले सोने वितळविणाऱ्या टोळीचा महसूल गुप्तचर विभागाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एस. एस. जोशी, ए. एस. केसरकर, व्ही. व्ही. कदम, पी. कुमार, एन. व्ही. ठक्कर, एस. जोशी, एस. नराळे, व्ही. ठक्कर, व्ही. एच. रबरी, एस. पी. त्रिपाठी आणि एस. पी. राठोड या अकरा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एकूण 11 किलो 880 ग्रॅम सोने आणि 8 किलो 720 ग्रॅम वजनाची चांदी जप्त केली असून त्याची किंमत वीस कोटींहून अधिक असल्याचे बोलले जाते. ऑपरेशन ब्लेझअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी होत असून संबंधित सोने नंतर वितळवले जात असल्याची माहिती मुंबई युनिटच्या डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकाऱ्यांनी ऑपरेशन ब्लेझअंतर्गत कारवाईला सुरुवात केली. या मोहीमेतंर्गत या अधिकाऱ्यांनी दक्षिण मुंबईतील चार वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळेस कारवाई केली.
यातील दोन कारवाईत सोने वितळविण्याचा प्रकार सुरु असल्याचे उघडकीस आले. तिथे सोने वितळवण्याच्या भट्टीचे एक युनिट होते. तसेच अन्य एका नोंदणी नसलेल्या दुकानात ते काम केले जात होते. या दोन्ही ठिकाणी सोन्याचे मेण आणि इतर स्वरुपात सोन्याच्या बारमध्ये रुपांतर करण्यासाठी संपूर्ण सेट बनविण्यात आले होते. त्यामुळे या दोन्ही भट्ट्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर दुसऱ्या युनिटने दोन दुकानांत कारवाई केली.
आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुख्य आरोपीने त्याच्या वडिलांसह मॅनेजरच्या मदतीने चार ठिकाणी भाड्याने घेतलेल्या जागी सोने वितळविण्याचे काम सुरु केले होते. त्याचा सविस्तर रेकॉर्ड ठेवला होता. त्यांनाही नंतर चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर इतर तीन डिलीव्हरी बॉयला या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. अटकेनंतर सर्व आरोपींना किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सोने तस्करी करणारी सराईत टोळी
या चारही कारवायांत वेगवेगळ्या ठिकाणाहून अकराजणांना ताब्यात घेतले होते. त्यात मुख्य आरोपीसह त्याचे वडिल, मॅनेजर, हिशोब तपासणारे, डिलीव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला. अटक आरोपी सोन्याची तस्करी करुन ते सोने गुप्त ठिकाणी असलेल्या भट्टीमध्ये वितळवत असल्याचे तपासात उघडकीस आले. सोन्याची तस्करी करणे, सोने वितळविणे, नंतर सोन्याची बेकायदेशीर विक्री करणे अशा जबाबदाऱ्या प्रत्येकाला सोपविण्यात आल्या होत्या. सोने तस्करी करणारी ही एक सराईत टोळी असल्याचे तपासात उघडकीस आले.