

Snajay Raut Letter To Congress High Command :
मनसेला महाविकास आघाडीत (MVA) घेण्याच्या हालचालींवरून ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मोठे मतभेद समोर आले आहेत. संजय राऊत यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात थेट पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिल्यामुळे काँग्रेस नेतृत्वाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
संजय राऊत यांनी आपल्या पत्रात, हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला आघाडीत घेण्यास विरोध केल्याचा उल्लेख करत त्यांची तक्रार केली होती. मात्र, सपकाळ यांच्या पाठीशी काँग्रेस पक्षश्रेष्ठी ठामपणे उभे असल्याचे दिसत आहे.
काँग्रेसमधील सूत्रांनुसार, राज ठाकरे यांना सोबत घेतल्यास परप्रांतीय मतदार दुरावण्याची भीती काँग्रेस श्रेष्ठींना वाटत आहे. राज ठाकरे यांची पूर्वीची 'परप्रांतीय विरोधी' भूमिका काँग्रेसच्या राष्ट्रीय धोरणांशी विसंगत आहे.
या वादावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी स्पष्ट केले की, "राज ठाकरे यांना आघाडीत घेण्याबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही किंवा चर्चा झालेली नाही. काँग्रेस एक राष्ट्रीय पक्ष म्हणून देशातील सर्व भाषा आणि लोकांचा आदर करतो. आमच्या धोरणांमध्ये 'परप्रांतीय' असा भेद नाही. त्यामुळे राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."
तसेच, सपकाळ यांनी चर्चा करून कळवतो असे सांगितल्यावरही राऊतांनी लगेच दिल्लीत पत्र पाठवणे, हे काँग्रेस नेतृत्वाला रुचलेले नाही.
दरम्यान, या घडामोडींमुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढण्याचा विचार करू शकते, असे संकेत मिळत आहेत. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी नुकतीच मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन पक्षांतर्गत परिस्थितीची माहिती दिली आहे.
एकंदरीत, संजय राऊत यांच्या एका पत्रामुळे महाविकास आघाडीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, मनसेच्या संभाव्य प्रवेशावरून दोन्ही पक्षांमध्ये राजकीय तणाव वाढल्याचे चित्र आहे.