

Sanjay Raut On Election Commission :
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम केलेली मतदार यादीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. ही मतदार यादी सदोष असल्याचा आणि त्यात मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट मतदारांचा समावेश असल्याचा आरोप करत महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला आहे. याबाबत पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी सदोष मतदार यादी अन् त्यावरच निवडणूक घेण्याचा आग्रह यावर कडाडून टीका केली. त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची आग्रही मागणी केली.
राजकीय नेत्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, "विधानसभेच्या निवडणुकीतील यादी सदोष असल्याचे स्पष्ट झाल्यावरही, निवडणूक आयोग त्याच यादीचा आग्रह का धरत आहे?" मधल्या काळात नाशिक, मुंबईतील वॉर्डांमध्ये आणि इतर अनेक ठिकाणी डुप्लिकेट मतदारांची संख्या वाढल्याचे पुरावे सादर करत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. "आम्ही प्रत्येक वॉर्डात जाऊन आकडेवारी गोळा करतोय. राजकीय कार्यकर्ते स्वतःच्या पैशाने दिवसरात्र काम करून यादीतील त्रुटी शोधत असताना, निवडणूक आयोगाकडे स्वतःची यंत्रणा का नाही? ते भाजपची यंत्रणा वापरत आहे. निवडणूक आयोग भाजपचा बटिक झाला आहे," असा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला.
मतदार यादीतील गोंधळ आणि ईव्हीएम मशीनच्या (EVM) वैधतेबद्दल शंका व्यक्त करत, विरोधी पक्षांनी निवडणुकीच्या प्रक्रियेवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. "सगळीकडं ईव्हीएम वापरणे शक्य नसेल, तर किमान मुंबईमध्ये तरी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या," अशी मागणी सर्व विरोधी पक्षांनी केली आहे. इतकेच नव्हे, तर 'संपूर्ण महाराष्ट्रातच बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, तुम्ही कशाला घाबरत आहात?' असे आव्हानही सत्ताधाऱ्यांना देण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 'पॅनल सिस्टीम' (एका प्रभागात चार नगरसेवक) हा निव्वळ 'फ्रॉड' असून तो घोळ करण्यासाठी भाजपने आणला आहे. मुंबईत एकास एक निवडणूक होते, तीच संपूर्ण महाराष्ट्रात झाली पाहिजे, असे मत व्यक्त करण्यात आले.
याचवेळी, शिंदे गटाच्या एका आमदाराने '२० हजार मतदार बाहेरून आणले' अशी कबुली दिल्याचा दाखला देत, विधानसभेत झालेले 'लाखो मतदारांचे उसवणे' (मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट मतदार जोडणे) या आरोपाला बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला. निवडणूक आयोगाने अशा वक्तव्यांची दखल घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
मतदार यादीचा वापर, ईव्हीएम आणि पॅनल सिस्टीम यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर महाविकास आघाडी आणि राज ठाकरे (मनसे) यांची एकत्रित भूमिका आज पत्रकार परिषदेत मांडणार आहे असं संजय राऊत यांनी सांगितलं.