

मुंबई : सायन येथील प्रभाग क्रमांक 176 व 185 मध्ये बॉस हरला व बॉसच्या मुलगी जिंकली, असा आगळावेगळा निकाल लागला आहे. त्यामुळे हा निकाल सायनमध्येच नाही, तर संपूर्ण मुंबईत चर्चेचा विषय बनला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आरक्षणामध्ये भाजपाचे उपाध्यक्ष माजी विरोधी पक्षनेता रवी राजा यांचा प्रभाग क्रमांक 176 ओबीसी महिला आरक्षणामध्ये गेला. त्यामुळे राजांना या प्रभागातून निवडणूक लढणे शक्य नव्हते. त्यामुळे राजा यांचे पीए आर. के. यादव यांची मुलगी रेखा यादव यांना उमेदवारी देण्यात आली.
यादव यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी फारसा निधीही नव्हता. त्यामुळे या प्रभागातील निवडणुकीचा खर्च राजा यांनीच केला. हा प्रभाग राजा यांनी गेल्या अनेक वर्षांपासून बांधून ठेवल्यामुळे येथून रेखा यादव निवडून आल्या. राजा यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भाजपाने त्यांना धारावीच्या प्रभाग क्रमांक 185 मधून उमेदवारी दिली.
राजा यांच्यासाठी हा प्रभाग नवीन असल्यामुळे महापालिका निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे राजा यांना आपल्या पराभवाचा धक्का बसला असला तरी आपल्या पीएच्या मुलीचा विजय झाल्यामुळे त्यांनी आपला पराभव बाजूला ठेवून, तिच्या आनंदात सहभागी झाले.