

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक (सायन) हॉस्पिटलमध्ये येत्या वर्षभरात क्षयरोग (टीबी) प्रयोगशाळा उभी राहणार आहे. यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून या प्रयोगशाळेसाठी 2 कोटी 7 लाख रुपये खर्च येणार आहे.
सायन हॉस्पिटलच्या सुक्ष्मजीव शास्त्र विभाग नियमितपणे वैद्यकिय नमुन्यांचे सुक्ष्मदर्शकाखाली तपासणी व घन माध्यमांवर संवर्धन मुख्यतः मायको-बॅक्टेरियमसाठी लोएन्स्टीन जेन्सेन माध्यमांवर प्रक्रिया करत असते. ही प्रक्रिया क्षयरोगाचे निदान करण्याकरिता सर्वाधिक उपयुक्त असते. परंतु नवीन उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाप्रमाणे द्रव संस्कृती प्रणाली व औषधांची संवेदनशीलता चाचणीद्वारे क्षयरोगाचे निदान त्वरीत होते. यासाठी सायन हॉस्पिटलमध्ये हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.
सायन हॉस्पिटलमध्ये दोन्ही द्रव संस्कृती प्रणाली व औषधांची संवेदनशीलता चाचणीद्वारे तंत्रज्ञानाकरिता आवश्यक पायाभुत सुविधा व वातानुकूलित यंत्रणा बसविणे आवश्यक आहे. यासाठी स्वतंत्र क्षयरोग प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.यासाठी वातानुकूलित यंत्रणेसह विद्युत कामे, अग्निशमक सुविधेबाबतची कामे, मॉड्युलर प्रयोगशाळा फर्निचर आदी कामे करण्यात येणार आहेत. दरम्यान, या कामाला येत्या 15 दिवसात सुरुवात होणार असून वर्षभरात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
पालिकेचे शिवडी येथे स्वतंत्र टीबी हॉस्पिटल असले तरी, प्रमुख हॉस्पिटलमध्ये टीबी रुग्णांवर उपचार केले जातात. परंतु येथील रुग्णांच्या विविध चाचण्यांसाठी शिवडी हॉस्पिटलमध्ये जावे लागते. त्यामुळे पालिकेने टप्प्याटप्प्याने प्रमुख हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक टीबी प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.