मुंबई : विकासक घराचा ताबा देण्यास विलंब करत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी शनिवारी कांदिवली येथील विकासक एस. डी. कॉर्पोरेशन शापूरजी यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. घरासाठी नोंदणी करून तीन वर्षे उलटूनही विकासक ताबा देत नाही, दुसरीकडे बँकेच्या कर्जाचे हप्ते भरावे लागत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.
कांदिवली पूर्वेकडील ठाकूर व्हिलेज, समता नगर येथील एस. डी. कॉर्पेरेशन विकासकाने टोलेजंग इमारत उभारणीसाठी नागरिकांकडून बुकिंगवेळी लाखो रूपये घेतले. मात्र तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही विकासकाकडून इमारत उभारणीसाठी विलंब केला जात आहे. तसेच याचा जाब विचारल्यास उलट रहिवाशांनाच उर्मटपणे उत्तरे दिली जात आहेत. यामुळे नागरिकांनी रस्त्यावर उतरून शापूरजी यांच्याविरोधात संताप व्यक्त केला.
विकासक एस.डी.कॉर्पोरेशन यांनी सियाना नावाच्या टोलेजंग इमारतीचे बांधकाम गेल्या 3 ते 4 वर्षांपासून सुरु आहे. तीन वर्षांपासून घर न मिळाल्याने रविवाशांना फक्त बॅकेचे हप्तेच भरावे लागत आहेत. याकडे रेरा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आता रहिवाशांकडून करण्यात आली.
सियाना इमारतीत एकूण 250 घरे आहेत. यामध्ये 22 मजली 5 इमारती आणि एक 50 मजली आहे. मात्र तिची उभारणीसुध्दा दाखविलेल्या प्लॅननुसार केलेली नाही. इमारतीमध्ये अनेक घरांना गळती लागलेली आहे. प्रवेश करण्याची जागा अरुंद आहे. असे अनेक आरोप उपस्थित नागरिकांनी केला. तसेच विकासकाविरोधात रेरामध्ये तक्रारी करणार्या नागरिकांना मिटिंगमध्ये येण्यास मनाई केली जात असल्याचा आरोपही यावेळी नागरिकांनी केला.
2022 साली 1.5 बीएचकेसाठी बुकिंग केले होते. त्यासाठी तीन लाख रुपये भरले होते. बुकिंगवेळी 2023 मध्ये ताबा देण्यात येणार सांगितले होते. परंतु आता 2025 आले तरीसुध्दा ताबा दिलेले नाही. यामुळे मी 40 हजार रुपये घर भाडे देवून इतर ठिकाणी राहत आहे. तसेच दर महिन्याला 75 हजार रूपये ईएमआर भरत आहे.
स्वाती गावडे, रहिवासी