

मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक लढवताना जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक दीपक सावंत यांना आपले नगरसेवक पद गमवावे लागले. गुरुवारी महापालिका सभागृहात याची अधिकृत घोषणा महापौर रितू तावडे यांनी केली.
मुंबई शहराचा नगरसेवक बनण्याची सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची इच्छा असते. यासाठी कोणत्याही स्तराला जाऊन महापालिका निवडणूक लढवतात. यात जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवली जाते. आतापर्यंतच्या पालिकेच्या इतिहासात जातीचे बनावट पत्र सादर करून निवडणूक लढविणाऱ्या डझनभरपेक्षा जास्त नगरसेवकांनी आपले पद गमावले आहे.
अलीकडेच झालेल्या पालिकेच्या निवडणुकीमध्ये नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव असलेल्या भांडुप एस विभाग प्रभाग क्रमांक १११ मधून नगरसेवक बनलेले दीपक सावंत यांचे जातीचे प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने अवैध ठरल्यामुळे गुरुवारी महापालिका सभागृहात याची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांचे संख्याबळ एकने कमी झाले. त्यामुळे ठाकरे गटाचे आता ६४ नगरसेवक राहिले आहेत.
शमीर पटेल यांना कोर्टाचा दिलासा
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव असलेल्या गोवंडी एम-पूर्व विभागातील १३७ प्रभागातून निवडून आलेल्या एमआयएमचे नगरसेवक शमीर रमजान पटेल यांचे जात प्रमाणपत्र अहिल्यानगर जिल्हा जात पडताळणी समितीने अवैध ठरल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची घोषणा सभागृहात होणार होती. परंतु कोर्टाने पटेल यांचे नगरसेवक पद रद्द करण्यास स्थगिती दिली. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद सध्या तरी वाचले आहे.