

मुंबई : मुंबई महानगरपालिकेमध्ये खोके व कंटेनरचे राजकारण पेटणार आहे. शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका व शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांनी मातोश्रीवर कंटेनर पोहचवल्याचा आरोप केल्यामुळे ठाकरे यांचे नगरसेवक चांगलेच दुखावले आहेत. या आरोपाला अर्थसंकल्पीय चर्चेच्या वेळी जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय चर्चासत्रात मुंबईच्या विकासावर बोलण्यापेक्षा सर्वच राजकीय पक्षाने एकमेकांवर चिखलफेक करण्यास महत्त्व दिले आहे. विशेषत: शिंदे शिवसेना व ठाकरे शिवसेनामध्ये डबलबारीचा सामना सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांकडून शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांना पन्नास खोके, एकदम ओके... असा वेळोवेळी टोमणा मारला जात आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक संतापले असून त्यांनी थेट आता मातोश्रीवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे.
बुधवारी झालेल्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या वेळी यामिनी जाधव यांनी थेट मातोश्रीवर आरोप केले. रवींद्र वायकर स्थायी समिती अध्यक्ष असताना, शिवसेना भवन उभे राहिले. राहुल शेवाळे स्थायी समिती अध्यक्ष असताना, शिवालय उभे राहिले, तर चार वर्षे यशवंत जाधव स्थायी समिती अध्यक्ष असताना मातोश्री दोन उभे राहिले.
त्यामुळे आम्ही काय केले असे जर म्हणत असाल, तर आम्ही मातोश्रीवर खोके नाही कंटेनर पोहचवले, असा थेट आरोप जाधव यांनी केला आहे. थेट मातोश्रीवर केलेल्या आरोपामुळे शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक नाराज झाले आहेत. ज्या मातोश्रीमुळे जे लोक मोठे झालेत त्या मातोश्रीबद्दल बोलताना स्वतःची पातळी घसरवत आहेत.
स्थायी समितीचे अध्यक्षपद स्वतःच्या कुवतीवर देण्यात आले नाही तर, मातोश्रीच्या आशीर्वादामुळे मिळाले. त्यामुळे मातोश्रीवर आरोप करताना एकदा नाही, दोनदा नाही तर दहा वेळा विचार करावा, असा सल्ला शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी शिंदेंच्या नगरसेवकांना दिला आहे.
आमचे तोंड अजून उघडू नका, अन्यथा सभागृहात सत्तेत असून बसता येणार नाही. ठाकरे यांचे शिवसैनिक कसे असतात हे आपल्यालाही ठाऊक आहे. त्यामुळे उगाच खोटे आरोप करून, शिवसैनिकांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नका, असा इशाराही शिवसेना नगरसेवकांनी दिला आहे. त्यामुळे खोके व कंटेनर राजकारण चांगले तापणार आहे.
राजकारणात संधी देणाऱ्यांवर कसले आरोप करता
आपण काही नव्हतो, त्यावेळी राजकारणात ज्या पक्षाने संधी दिली, त्या पक्षाच्या नेत्यासह कुटुंबावर अशाप्रकारे घाणेरडे आरोप करणे योग्य नाही. अशा प्रकारचे आरोप करून, स्वतःलाच अडचणीत आणू नका, असा सल्ला शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिला.