Thackeray Vs Shinde: राज्याच्या राजकारणात पुन्हा शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्ष

अशा परिस्थितीत ठाकरे गटाचे लोकसभेतील सहा खासदार फोडण्याचे काम शिंदे करत असल्याने ठाकरे गटात कमालीची अस्वस्थता आहे.
Thackeray Vs Shinde
Thackeray Vs Shinde(Pudhari Photo)
Published on
Updated on

नरेश कदम

मुंबई: अवघ्या चार वर्षांत शिवसेना ठाकरे गटात दोन वेळा फूट. पहिल्या फुटीत ४० आमदार आणि १३ खासदार तर दुसऱ्या फुटीत सहा खासदार शिंदे गटात जाणार असल्याचे दावे केले जात आहेत.

त्यातच आणखी आमदार आणि नगरसेवक फोडले जाणार असल्याचे संकेत शिंदे गटाने दिले असल्याने ही फूट रोखायची कशी, असा प्रश्न पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पडला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष अटळ दिसत आहे.

Thackeray Vs Shinde
High Court False Case Verdict: १० खोट्या केसेस करणाऱ्या महिलेला हायकोर्टाचा दणका

राज्यातील महायुती सरकारकडे बहुमत असतानाही केंद्रातील मोदी सरकारकडील बहुमतांचा आकडा वाढविण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर केले. २०२२ मध्ये शिवसेनेत पाडलेल्या फुटीची जखम अजून भरलेली नाही. अशा परिस्थितीत ठाकरे गटाचे लोकसभेतील सहा खासदार फोडण्याचे काम शिंदे करत असल्याने ठाकरे गटात कमालीची अस्वस्थता आहे.

उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांमध्ये ही अस्वस्थता वर्धापन दिनाच्या मेळाव्यात स्पष्ट दिसत होती. उद्धव ठाकरे हे पुढची दिशा काय ठरविणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष होते. पक्षफुटीबद्दल चहुबाजूने टीका होत असल्याने खुद्द ठाकरेच व्यथित असल्याचे त्यांनी भाषणात बोलून दाखवले. पुढील फूट टाळण्यासाठी पक्षप्रमुखपद सोडायला तयार असल्याचे सांगून भावनिक अस्त्रही शिवसैनिकांवर टाकले.

उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुखपदावरून हटविण्याची ताकद असलेला एकही नेता त्या पक्षात नाही. उद्धव यांचे दुखणे वेगळे आहे. शिंदे यांच्या सोबत आमदार, खासदार आणि नेते गेले. त्यांना मिळालेली सत्तेची ताकद आणि आर्थिक सुबत्ता यामुळे ठाकरे गटातील आमदार आणि खासदार तसेच अनेकांचे डोळे दिपून गेले आहेत.

२०२९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे सत्ता जवळपास दिसत नाही. त्यामुळे आपले काय, ही चिंता ठाकरे गटाच्या नेत्यांना सतावत आहे आणि या चिंतेवर उद्धव यांच्याकडे कोणतेही उत्तर नाही. त्यामुळे अशा भावनिक आवाहनाने भविष्यातील फूट टळेल हे कठीण वाटत आहे.

Thackeray Vs Shinde
India Bullet Train Network: मुंबई-पुणे, पुणे-हैदराबादसह आणखी सात मार्गांवर बुलेट ट्रेन

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांत एक आशेचा किरण दिसत होता. पुरोगामी कार्यकर्ता नितीन चंदनशिवे यांनी एक कविता सादर केली आणि एक मनोगत व्यक्त केले. ग्रामीण पाड्यावर एक हुंदका फुटत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे, तुम्ही महाराष्ट्र पिंजून काढा, असे आवाहन चंदनशिवे यांनी केले. त्याला शिवसैनिकांचा मिळालेला प्रतिसाद ही एक आशा आहे, हे दाखवून देत होते.

एकीकडे ठाकरे गटाच्या मेळाव्यात तुडवा ऑपरेशन बोलले जात होते तेव्हा दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणात, तुडवायला पाय शिल्लक राहतील का, असे प्रत्युत्तर दिले गेले. शिवसेनेच्या इतिहासात शिंदे यांच्या इतके मोठे खिंडार याआधी कोणी पाडले नव्हते. शिंदे यांची पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा आहे.

त्यासाठी ते कोणतेही ऑपरेशन करतील. ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे यांच्या गळाला लागल्याने त्‍यांच्या गटाच्या खासदारांची संख्या १३ होईल. राज्यात भाजपचे केवळ ९ खासदार आहेत. त्यामुळे शिंदे यांचे ऑपरेशन टायगर हे राज्यातील भाजपच्या नेतृत्वासाठी डोकेदुखी ठरू शकते. तसेच २०२२ च्या शिवसेनेच्या फुटीनंतर लोकसभेच्या २०२४ मध्ये निवडणुका झाल्या त्यात महायुतीला फटका बसला होता. त्यामुळे भाजप सावध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news