मुंबई : आर्थिक फसवणूक प्रकरणी अडचणीत आलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीला उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला. तुमचा राज कुंद्रा यांच्या कंपनीशी काहीही संबंध नसेल तर तुम्ही माफीचा साक्षीदार का होत नाही, अशी विचारणा मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने केली आणि पुढील सुनावणी 16 ऑक्टोबरला निश्चित केली.
आर्थिक फसवणूक प्रकरणी अडचणीत आलेल्या राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने लुकआऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे त्यांना देश सोडून कुठेही जाण्यास निर्बंध आहेत. 2 ते 5 ऑक्टोबर दरम्यान कौटुंबिक सहलीनिमित्त फुकेतला जाण्याची परवानगी मिळावी यासाठी दोघांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. त्यानंतर दोघांनी त्यांच्याविरोधात बजावलेली लुक आऊट नोटीस तीन महिन्यांकरता स्थगित करण्याची मागणी करत पुन्हा हायकोर्टाकडे विनंती केली. या याचिकेवर मंगळवारी न्या. चंद्रशेखर आणि न्या. अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
या प्रकरणातील मुख्य आरोपी कुंद्रा आहेत, तर शेट्टी यांच्याविरुद्ध कोणताही विशिष्ट आरोप नाही. तपास यंत्रणेने फक्त ती संचालकांपैकी एक असल्याचे सांगितले आहे.राज कुंद्राच्या कंपनीशी शिल्पा शेट्टीचा संबंध नाही. कुंद्राने काही रक्कम शेट्टी यांना पाठवली होती. त्याबाबत शेट्टी यांनी चौकशीत सहकार्य केले आहे आणि जेव्हा जेव्हा त्यांना बोलावण्यात आले तेव्हा त्यांचे जबाब नोंदवले गेले आहेत याकडे शिल्पा शेट्टीच्या वतीने ॲड. निरंजन मुंदरगी यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.
कुंद्राच्या पालकांना भेटण्यासाठी त्यांचा “फुरसतीचा कौटुंबिक प्रवास” शक्य नसला तरी, शेट्टीला 21 ते 24 ऑक्टोबर दरम्यान आयोजित कार्यक्रमासाठी लॉस एंजेलिसला जावे लागेल आणि कोलंबोला आणखी एक कामासाठी प्रवास करावा लागणार असल्याने लुकआऊट नोटीसीला अंतरिम स्थगिती द्यावी, अशी विनंती त्यांनी केली. त्यावर खंडपीठाने शिल्पा शेट्टीला माफीचा साक्षीदार होण्याचीच सूचना केली. तुमचा राज कुंद्रा यांच्या कंपनीशी काहीही संबंध नसेल तर तुम्ही माफीचा साक्षीदार का होत नाही? तसेच राज कुंद्राच्या कंपनीशी शिल्पा शेट्टीचा काहीही संबंध नाही हे राज कुंद्रा प्रतिज्ञापत्रावर सांगण्यास तयार आहेत का, अशी तोंडी विचारणाही केली.