

Shefali Jariwala
मुंबई : अभिनेत्री शेफाली जरीवालचा मृत्यू अचानक रक्तदाब (बीपी) कमी झाल्यामुळे असू शकतो, असा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी शेफालीच्या मृत्यूमागे कोणताही घातपात असण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. आम्ही शवविच्छेदन अहवालाची (पोस्ट-मॉर्टम रिपोर्ट) वाट पाहत आहोत, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय अभिनेत्री शेफाली जरीवाला शुक्रवारी रात्री तिच्या घरी बेशुद्ध पडली. त्यानंतर तिचा पती पराग त्यागी यांनी तिला अंधेरीतील बेल्लेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र तिथे डॉक्टरांनी तिला दाखल केल्यानंतर मृत घोषित केले. प्राथमिक तपासणीत हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर शवविच्छेदनासाठी तिचे पार्थिव जुहू येथील आर. एन. कूपर रुग्णालयात हलवण्यात आले.
पोलिसांनी सांगितले की, कूपर रुग्णालयातील डॉक्टरांना शेफाली जरीवालाच्या मृत्यूचे कारण, रक्तदाब अचानक कमी झाला असल्याचा संशय आहे. शेफालीने रविवारी घरी सत्यनारायण पूजेचा उपवास केला होता. तिच्या पतीने पोलिसांना सांगितले की, उपवासानंतर तिने आदल्या दिवशीचे जेवण खाल्ले आणि त्यानंतर ती बेशुद्ध पडली. पोलिसांनी शेफालीचा पती आणि कुटुंबीयांचे जबाब नोंदवले आहेत. त्यांच्या घरातून पंचनामा करताना पोलिसांना अँटी-एजिंग गोळ्या, स्किन ग्लो गोळ्या आणि व्हिटॅमिनच्या गोळ्या असलेले दोन बॉक्स सापडले. शेफालीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ती डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेत होती, परंतु त्यामुळे तिला कधीही कोणताही त्रास झाला नाही, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अद्याप कोणताही घातपाताचा संशय नाही. आम्ही शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहोत, असेही अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्यानंतर शेफालीच्या कुटुंबीयांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले.