

NCP NDA Merger News : "शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भाजप नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मध्ये जायचे आहे, अशी चर्चा १०० टक्के सुरू आहे, असा दावा करत आता विचारधारा सोडून तिकडे (भाजपसोबत) जायचे की विचारांची कास धरून आमच्याकडे (काँग्रेसकडे) यायचे, हे त्यांनीच ठरवावे. शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत. ज्यांना आमच्याकडे यायचे आहे, त्या सर्वांचे आम्ही स्वागत करतो. जर त्यांच्याकडून तसा काही निरोप आला, तर आम्ही चर्चेसाठी पूर्णपणे तयार आहोत," असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज (दि. ७ जुलै) माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
शरद पवार आपला गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, काँग्रेसमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही स्वागत करतो. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मध्ये जायचे आहे, अशी चर्चा १०० टक्के सुरू आहे. आता विचारधारा सोडून तिकडे (भाजपसोबत) जायचे की विचारांची कास धरून आमच्याकडे (काँग्रेसकडे) यायचे, हे त्यांनीच ठरवावे. शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत. ज्यांना आमच्याकडे यायचे आहे, त्या सर्वांचे आम्ही स्वागत करतो. जर त्यांच्याकडून तसा काही निरोप आला, तर आम्ही चर्चेसाठी पूर्णपणे तयार आहोत, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना वडेट्टीवार यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या घाईवरून राज्य सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, "मिसिंग लिंकच्या उद्घाटनाची एवढी घाई का केली? ज्या कंत्राटदाराने मिसिंग लिंकचे काम केले, त्याने राजकीय पक्षांना तब्बल ९०० कोटी रुपयांचा फंड दिला आहे. अशा कंत्राटदाराकडून चांगल्या कामाची अपेक्षा कशी करणार?" असा थेट सवाल वडेट्टीवार यांनी केला. ते पुढे म्हणाले, "आम्ही सीलिंक बांधला, त्याला १८ वर्षे झाली तरी काही झाले नाही. मिसिंग लिंकचा रस्ता मुळात डोंगरातून जातो, मग डिझाईन करताना याचा विचार व्हायला नको होता का? आता यात 'अॅक्ट ऑफ गॉड'चा (दैवी आपत्ती) काय संबंध?" असे सवालही त्यांनी उपस्थित केले.
मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरण आणि पर्यावरण ऱ्हासावरून त्यांनी भाजपला धारेवर धरले. "मुंबईत भाजपने सत्ता घेतली आणि मुंबईची पूर्ण वाट लावली," असा आरोपही त्यांनी केला. सिमेंटचे रस्ते तयार करताना झाडांची अजिबात काळजी घेतली गेली नाही, त्यामुळे त्यांच्या मुळांना मोठी हानी पोहोचली आहे. "पूर्वी एका वर्षात ६०० झाडे पडायची, पण आता सिमेंटच्या कामांमुळे परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की एका दिवसात ३५० झाडे पडत आहेत," याकडे वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले.
शरद पवार आपला गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शरद पवारांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत दोनदा स्वतःचा पक्ष स्थापन केला, पण ते कधीही उघडपणे भाजपसोबत गेले नाहीत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता, हा एकमेव अपवाद वगळता त्यांनी नेहमी भाजपविरोधी भूमिका घेतली आहे. काही वर्षांपूर्वीच काँग्रेसने राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला होता, त्यामुळे काँग्रेस या पर्यायासाठी सकारात्मक आहे. शरद पवार गट विलीन झाल्यास काँग्रेसची ताकद वाढेल आणि पवार गटालाही फुटीचे भय राहणार नाही.
सूत्रांनुसार, विलीनीकरणाच्या बदल्यात शरद पवार गटाने काँग्रेसकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्तराप्रमाणेच राज्यातील त्यांचे विद्यमान आमदार आणि खासदारांचे मतदारसंघ अबाधित राहिले पाहिजेत, ही मुख्य मागणी आहे. परंतु, दुसरीकडे पवार गटातील काही खासदार वेगळ्या भूमिकेत आहेत. "आतापर्यंत आपण विरोधी पक्षात होतो, आता जायचे असेल तर सत्तेसोबत (भाजप आणि शिंदे गट) जाऊया, जेणेकरून मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मिळेल," असा सूर काही खासदारांचा आहे.