NCP SP Bill Support | राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे खासदार ‘त्या’ विधेयकांना पाठिंबा देणार

भाजपचा मार्ग होणार सुकर; राजकीय समीकरणे बदलणार
Sharad Pawar News
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (File Photo)
Published on
Updated on

मुंबई : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात यापूर्वी बहुमताअभावी फेटाळले गेलेले मतदारसंघ फेररचना आणि महिला आरक्षण विधेयक पुन्हा नव्याने मांडण्यात येणार असून यावेळी तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना उबाठातील फुटलेल्या खासदारांमुळे सत्तापक्षाची मते वाढली आहेत. ही विधेयके पारित व्हावीत यासाठी भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मदत करणार असल्याचे समजते. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने या दोन्ही विशेषतः महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा द्यायची तयारी दाखवली आहे.

द्रमुक तसेच विरोधी बाकांवर बसलेल्या इंडिया आघाडीतील काही पक्ष या विधेयकांबाबत सत्ताधारी भाजपला अनुकूल भूमिका घेणार आहेत. समाजवादी पक्षातील काही खासदार फुटणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यातच महाराष्ट्रात उबाठाच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाचे काही खासदार पक्षांतर करणार आहेत. ते सत्ताधारी भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या विधेयकाला एनडीएच्‍या बाजूला येऊन मतदान करतील, अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे. मात्र विधेयकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अनुकूल असल्याने या पक्षात कोणतीही अस्वस्थता निर्माण करण्याचा भाजपचा विचार नसल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही खासदारही सत्ताधारी युतीच्या दिशेने पावले टाकण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ५ खासदार बाहेर पडण्याच्या मन:स्थितीत आहेत. ते भाजपत जातील अशी शंका काँग्रेसला आहे तर ‘आणखी बरेच काही घडणार’ हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान हे पाच खासदार त्यांच्या पक्षात विलीन होणार याचे निदर्शक तर नाही ना, असा प्रश्नही केला जातो आहे. आमचा एकही खासदार फुटणार नाही, असा विश्‍वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्‍यक्‍त केला आहे. त्यामागे महाराष्ट्रातील अतिवरिष्ठ स्तरावरून दिल्लीत केंद्रीय भाजप नेत्यांशी झालेल्या चर्चेचा संदर्भ आहे.

‘विरोधात राहून सहकार्य’

मतदारसंघातील विकासकामांना गती मिळत असेल तर विरोधी भूमिका बदलण्यास हरकत नाही, असे शरद पवार यांच्या गटातील किमान ४ ते ५ खासदारांना वाटते. मात्र, पक्ष नेतृत्वाने विधेयकाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करायचा शब्द दिला असल्याने सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी पाठवलेल्या निरोपांकडे लक्ष दिले गेलेले नाही. आगामी काळातील पुढच्या २० वर्षांच्या राजकारणाचा पट लक्षात घेता भाजपला मतदारसंघ फेररचना प्रत्यक्षात आणायची आहे. त्यासाठी आवश्यक असलेले दोन तृतीयांश संख्याबळ भाजपला हवे आहे. आम्ही या विधेयकबाबत विरोधी मतदान करणार नाही, असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसने दिला असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपतील वरिष्ठ सूत्रांनी या विधेयकांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचा विरोध नसेल एवढेच सध्या बोलतो, असे मार्मिक विधान 'पुढारी'शी बोलताना केले. या संबंधात सकारात्मक चर्चा झाल्या आहेत असेही समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news