NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला नवे वळण; सुनील तटकरे यांच्या वक्तव्याने संभ्रम

ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांच्या भेटीसाठी अजित पवार गटातील नेत्यांची ये-जा सुरू असताना, विलीनीकरणाबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळी वक्तव्ये केली जात आहेत.
Sunil Tatkare News
Sunil Tatkare NewsPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अजित पवार गटाच्या नेत्यांनी घेतलेल्या भेटीगाठी आणि विलीनीकरणाच्या चर्चांवरून दोन्ही पक्षांमध्ये संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षांचे नेते आता विलीनीकरणाबाबत स्वतंत्रपणे आपली भूमिका मांडू लागल्यामुळे शुक्रवारी राजकीय फड चांगलाच रंगला.

सुनील तटकरे यांचा आधी नकार, आता होकार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत चर्चेने शुक्रवारी जोर धरला असताना, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या चर्चेला ब्रेक दिला आहे. आज अजित पवार असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र दिसले असते, असे वक्तव्य करून तटकरे यांनी विलीनीकरणाचा विषय मागे पडला असल्याचे स्पष्ट केले.

Sunil Tatkare News
BDD Chawl Redevelopment: बीडीडी चाळ पुनर्विकासाला गती; लोअर परळमधील ५५७ रहिवाशांना नव्या घरांच्या चाव्या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा झाली नाही, अशी भूमिका सुरुवातीला तटकरे यांनी घेतली होती; पण आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची नक्की चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार असते, तर १२ फेब्रुवारी रोजी विलीनीकरण नक्की झाले असते. दादांच्या प्रखर इच्छाशक्तीतून आणि त्यांनी ठरवलेल्या बाबींनुसार हे घडेल, हे निश्चित होते.

अनिल देशमुख यांचे तटकरे यांना सवाल

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत जयंत पाटील यांच्या घरी आणि बारामतीत अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या होत्या. एवढेच नव्हे, तर एकत्र आल्यानंतर प्रांताध्यक्ष कोणाला करायचे इथपर्यंतची चर्चा पूर्ण झाली होती, असा गौप्यस्‍फोट शरद पवार गटाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

Sunil Tatkare News
Mumbai Construction Pollution : प्रदूषण करणाऱ्या बिल्डरांना मनपाकडून अभय !

बारामती येथे अजित पवार आणि आमच्या पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शेवटच्या बैठकाही पार पडल्या होत्या; पण अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांनी ‘अशी कोणतीही बैठक किंवा चर्चा झालीच नाही,’ असे सांगत सपशेल नकार दिला होता; मग आज अचानक घुमजाव करत तटकरे ‘अजित पवार असते तर १२ फेब्रुवारीला विलीनीकरण झाले असते,’ असे का म्हणत आहेत? तटकरे यांच्यावर कोणाचा दबाव होता, ज्यामुळे त्यांनी दोन्ही पक्ष एकत्र येऊ दिले नाहीत, असे सवालही देशमुख यांनी उपस्थित केले आहेत.

तटकरे यांच्या कबुलीने आमच्या विधानावर शिक्कामोर्तब

शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, तटकरे यांनी आता त्यावेळची वस्तुस्थिती मांडली असून, विलीनीकरणाबाबत आम्ही पूर्वीपासून मांडत असलेल्या भूमिकेवर त्यांच्या विधानाने शिक्कामोर्तब झाले आहे.

जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या, तर चित्र वेगळे दिसले असते. अजित पवार यांनाही हेच अपेक्षित होते.

दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्रात मजबूत राजकीय ताकद उभी करावी, ही दोन्ही नेत्यांची इच्छा होती, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. आता विलीनीकरणाची शक्यता शशिकांत शिंदे यांनी तूर्तास फेटाळली आहे.

तेव्‍हा खोटे का बोललात? रोहीत पवार यांचा सवाल

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनिकरणाची चर्चा झालीच नाही, असे सांगणारे सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल आता चर्चा झाल्याचे का सांगत आहेत. दादांच्या निधनानंतर त्यांनी ही वस्तुस्थिती का लपवून ठेवली आणि खोटे का बोलले, असा थेट सवाल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत.

रोहीत म्हणाले, अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार होते, हे आम्ही आधीपासूनच सांगत होतो. पण अजितदादांच्या निधनानंतर तटकरे आणि पटेल विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती असे सांगत होते.

आता अचानक असं काय घडलं की, ते पुन्हा विलीनीकरणाच्या चर्चा झाल्याचे मान्य करत आहेत? अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गोटात सध्या तटकरे आणि पटेल प्रचंड अडचणीत आले असावेत, अशी शक्यता आहे. पक्षामध्ये त्यांचं सध्या कितपत चालतं, याबद्दल शंका आहे. स्वपक्षात अडचणी आल्यामुळेच त्यांनी आपली राजकीय भूमिका बदलली असावी.

अजित पवार यांच्या निधनापूर्वी विलीनीकरणाबाबत चर्चा आणि बैठका झाल्याचे सुरुवातीला शरद पवार गटाच्या नेत्यांनी जाहीर केले होते; पण अशा प्रकारच्या चर्चा झाल्याच नाहीत, अशी भूमिका अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली होती. आता त्यांनी आपल्या भूमिकेवरून यू टर्न घेतला आहे.

तर, ईश्वरपूर आणि बारामतीत बैठका झाल्याचा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गौप्यस्‍फोट करत, एकीकृत राष्ट्रवादीच्‍या प्रदेशाध्यक्षपदासाठी नावसुद्धा ठरले होते, असे सांगितले. शरद पवार गटाचे प्रदेशाध्‍यक्ष शशिकांत शिंदे यांनी मात्र आता विलीनीकरण अशक्‍य असल्‍याचे म्‍हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.