दोन आठवड्यांत शरद पवार - एकनाथ शिंदे यांची दुसऱ्यांदा भेट; चर्चांना उधाण
पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज (दि.३) वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. दोन आठवड्यांतील शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यातील ही दुसरी भेट आहे. याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली होती.
Summary
मराठा आरक्षणावर शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात चर्चा
दोन आठवड्यांतील शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यातील ही दुसरी भेट
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापू लागले
जरांगेंच्या अल्टीमेटमनंतर भेटीला महत्त्व
राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापले आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी १३ ऑगस्टपर्यंत राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीवर पवार आणि शिंदे यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाली. दोन आठवड्यांतील शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यातील ही दुसरी भेट आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू झाली आहे.
मराठा आंदोलनाबाबत तुमची भूमिका स्पष्ट करा, फडणवीसांचे विरोधकांना आवाहन
उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांना माझा प्रश्र आहे. या मराठा आंदोलनाबाबत तुमची भूमिका स्पष्ट करा. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यायचे का, तुमचे समर्थन आहे का, ते स्पष्ट करा, अशी आक्रमक भूमिका मांडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी नेत्यांना आवाहन दिले. तुमचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही. हा खोटारडेपणा समोर आणावाच लागेल, असे त्यांनी सांगितले.