Sharad Pawar Meet Eknath Shinde | मराठा आरक्षणाबाबत शरद पवार घेणार एकनाथ शिंदेंची भेट
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापले आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी १३ ऑगस्टपर्यंत राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी-एससीपी अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज (दि. ३) वर्षा निवासस्थानी भेट घेणार आहेत. (Sharad Pawar Meet Eknath Shinde)
मराठा आरक्षणाबाबत विरोधी नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी
उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांना माझा प्रश्र आहे. या मराठा आंदोलनाबाबत तुमची भूमिका स्पष्ट करा. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यायचे का, तुमचे समर्थन आहे का, ते स्पष्ट करा, अशी आक्रमक भूमिका मांडत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी नेत्यांना आवाहन दिले. तुमचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही. हा खोटारडेपणा समोर आणावाच लागेल, असे त्यांनी सांगितले. (Sharad Pawar Meet Eknath Shinde)
याआधी २२ जुलैरोजी दोघांमध्ये चर्चा
खासदार शरद पवार यांनी २२ जुलैरोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथी गृहावर भेट घेतली होती. मराठा, ओबीसी आरक्षण आणि अन्य मुद्द्यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगितले जात होते. या भेटीत जलसंपदा, दुधाचे दर आणि साखर कारखान्यांचे काही प्रलंबित प्रश्न यासहित अनेक विषयांवर त्यांच्यात सखोल चर्चा झाल्याचे बोलले जात होते.

