

Sharad Pawar Health Update: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना पुढील तपासण्यांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली होती. दरम्यान, शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती त्यांच्या डॉक्टरांनी दिली आहे.
शरद पवार यांना काही दिवसांपासून खोकला आणि छातीच्या संसर्गाचा त्रास होत होता. तसेच त्यांना ब्रॉन्कायटिसचीही समस्या जाणवत होती. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या पुढील वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या.
शरद पवार यांना काल सकाळी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर पुढील तपासण्यांसाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली होती. 'आम्ही बाबांना पुढील तपासण्यांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करत आहोत,' असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.
शरद पवार यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. शरद पवार यांना खोकला, छातीचा संसर्ग आणि ब्रॉन्कायटिसचा त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या आणि उपचार सुरू आहेत. शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत समोर आलेल्या या माहितीनंतर त्यांच्या समर्थकांकडून आणि कार्यकर्त्यांकडून ते लवकर बरे व्हावेत, अशा सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.