

मुंबई: सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) बाजार मध्यस्थांसाठी एक सामायिक जाहिरात संहिता अधिसूचित केली आहे. आपला ब्रँड किंवा संस्थास्तरावरील प्रचारासाठी सेलिब्रिटींना नियुक्त करण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सोबतच, काही विशिष्ट आर्थिक उत्पादने किंवा सेवांच्या जाहिरातींना प्रतिबंधित करण्यात आले आहे.
सामायिक जाहिरात संहिता (सीएसी) ही स्टॉक ब्रोकर्स, डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्, गुंतवणूक सल्लागार, संशोधन विश्लेषक, ऑनलाईन बाँड प्लॅटफॉर्म प्रदाते, पोर्टफोलिओ व्यवस्थापक आणि म्युच्युअल फंड आणि मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांसह नियमित संस्थांना लागू होईल.
सेलिब्रिटींना ब्रँडस्तरावर किंवा संस्थास्तरावर नियमित संस्थेची जाहिरात करण्याची परवानगी असेल. अशा जाहिरातींमध्ये संस्थेद्वारे देऊ केलेल्या उत्पादनांच्या किंवा सेवांच्या नावाचा समावेश असू शकतो.
परंतु, कोणत्याही विशिष्ट उत्पादन किंवा सेवेबद्दल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणतेही प्रलोभन किंवा दावा केला जाऊ शकत नाही, असे ‘सेबी’ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
सेलिब्रिटी असलेल्या कोणत्याही जाहिरातीसाठी पर्यवेक्षक मंडळाची किंवा जर नियमित संस्थेसाठी असे कोणतेही मंडळ निर्दिष्ट केले नसेल, तर ‘सेबी’ची पूर्वपरवानगी आवश्यक असेल. सेलिब्रिटींच्या जाहिरातींवर होणारा खर्च ग्राहकांवर लादला जाणार नाही किंवा म्युच्युअल फंड योजनेवर आकारला जाणार नाही.
काही विशिष्ट अटींच्या अधीन राहून, नियंत्रित संस्थेला जाहिरातीमध्ये केवळ ‘भूतकाळातील जोखीम आणि परतावा पडताळणी संस्थे’ने दिलेले रेटिंग किंवा क्रमवारी वापरण्याची परवानगी असेल.