

मिलिंद कारेकर
मुंबई: मुंबईच्या गजबजलेल्या व्यापारी परिसराला नाव देणाऱ्या प्रसिद्ध काळबादेवी मंदिराचा इतिहास ३०० वर्षांहून अधिक जुना आहे. शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर या स्वयंभू आणि जागृत देवीच्या मंदिराचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
मुंबईतील महत्त्वाच्या आणि गजबलेल्या परिसरात असलेल्या या मंदिराचे मूळ स्थान सुरुवातीला माहिम येथे होते. त्यानंतर ते आझाद मैदान, म्हणजेच पूर्वीच्या कापाच्या मैदानावर होते. इतिहासातील नोंदीनुसार, ३०० वर्षांपूर्वी आझाद मैदान परिसरात रघुनाथ कृष्ण जोशी यांनी काळबादेवीची प्रतिष्ठापना केली होती.
रघुनाथ कृष्ण जोशी यांच्या निधनानंतर सुमारे २२५ वर्षांपूर्वी ब्रिटिशांच्या दबावामुळे या मंदिराचे सध्याच्या काळबादेवी परिसरात स्थलांतर करण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत या मंदिराची आणि देवीची संपूर्ण व्यवस्था जोशी घराण्याकडेच आहे. सध्या जोशी कुटुंबाची सातवी पिढी ही व्यवस्था पाहत असून दिनेश जोशी हे सातव्या पिढीतील विश्वस्त आहेत.
तीन देवींचे एकत्रित दर्शन
काळबादेवी मंदिरात काळबादेवीसोबतच महालक्ष्मी देवी आणि सरस्वती देवीचीही प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. काळबादेवीला गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. नवरात्रौत्सव काळात येथे भाविकांची मोठी गर्दी होते.
परंपरेनुसार येथे सर्व धार्मिक पूजाविधी केले जातात. विशेष म्हणजे नवमीच्या दिवशी येथे हवनाचे आयोजन करण्यात येते. डिसेंबर-जानेवारी दरम्यान मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील अमावस्येला येथे मोठी जत्रा भरते. गगनगिरी महाराज, पिंगळाचे राहुल महाराज, इंदूरचे नाना महाराज अशा महान व्यक्ती आणि धर्मपंडितांनीही या देवीचे दर्शन घेतल्याचे सांगितले जाते.
सध्या हे मंदिर अत्यंत अरुंद आणि भरगर्दीच्या बाजारपेठेत असल्याने भाविकांना दर्शनासाठी अडचण होते. ही गैरसोय दूर करण्यासाठी लवकरच मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिराची जागा वाढवण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्त दिनेश जोशी यांनी दिली.
क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान
या मंदिराचा स्वातंत्र्य लढ्याशीही जवळचा संबंध आहे. इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे अनेक क्रांतिकारक याच परिसरात वास्तव्यास होते. हुतात्मा बाबू गेनू, चाफेकर बंधूंचे सहकारी काळबादेवीचे दर्शन घेऊनच आपल्या क्रांतिकारी कार्याला सुरुवात करत असल्याचे इतिहास सांगतो.