मालवण येथील राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याला पोलिसांनी बुधवारी (दि.4) कल्याणमधून राहत्या घरातील अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपटे हे सध्या पोलीस उपायुक्त (डीसीपी) कार्यालयात आहेत. 26 ऑगस्ट रोजी 35 फूट उंच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्यापासून सुमारे 10 दिवस बेपत्ता आणि सापडत नसल्याने कल्याणमधील 24 वर्षीय शिल्पकाराला अटक करण्यात आली आहे.
मोठे पुतळे बांधण्याचा कोणताही पूर्व अनुभव नसलेल्या कल्याणमधील आर्ट कंपनीचे मालक आपटे यांच्याकडे सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्याची जबाबदारी होती, ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये करण्यात आले होते.
मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंपनीचा मालक जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट डॉ. चेतन पाटील या दोघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. डॉ. चेतन पाटीलला पोलिसांनी अटक केली. मात्र जयदीप आपटे हा पोलिसांना वारंवार चकवा देत होता. बुधवारी (दि.4) रात्री जयदीप आपटे त्याच्या कल्याणामधील कुटुंबियास भेटण्यास आला होता. याची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. गुरूवारी (दि.5) दुपारी कल्याण कोर्टात हजर केल्यानंतर त्याला मालवण पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.