Chhatrapati Shivaji Maharaj Statue | राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणारा जयदीप आपटे आहे तरी कोण ?

वादग्रस्त शिल्पकाराची धक्कादायक माहिती उजेडात
Chhatrapati Shivaji Maharaj Statue
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणारा जयदीप आपटे आहे तरी कोण ?File Photo
Published on
Updated on

डोंबिवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा नौदल दिनी अर्थात सोमवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेनंतर देशभरातच नव्हे तर जगाच्या पाठीवरील समस्त शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा पुतळा साकारणारा शिल्पकार जयदीप आपटे आहे तरी कोण ? असा सवाल उपस्थित होत असतानाच शिवरायांचा पुतळा उभारणाऱ्या कथित शिल्पकाराची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

पुतळा दुर्घटनेला जबाबदार असलेल्या जयदीप आपटे आणि डॉ. चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील डॉ. चेतन पाटील याला अटक करण्यात आली. मात्र पुतळा दुर्घटनेनंतर गुन्हा दाखल झाल्यापासून भूमिगत झालेला आरोपी जयदीप आपटे हाती लागला नसून पोलिस त्याला जंग जंग पछाडत आहेत.

भारतीय नौदलाने शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याची उभारणी करुन घेतली होती. हा पुतळा उभारण्याचे कंत्राट कल्याणच्या जयदीप आपटे याला देण्यात आले होते. पुतळा तयार करणाऱ्या जयदीप आपटे याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. सिंधुदुर्गातील छत्रपती शिवरायांचा 28 फुटी पुतळा उभारणारा जयदीप आपटे नेमका कोण ? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. नौदल दिनानिमित्त 4 डिसेंबर 2023 रोजी या पुतळ्याचे अनावरण सोहळा पार पडला होता. किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे कंत्राट कल्याणात राहणाऱ्या जयदीप आपटे याला देण्यात आले होते. या पुतळ्याची देखरेख आणि निगा राखण्याची जबाबदारी नौदलाची होती. यासाठी नौदलाने मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंपनीला कंत्राट दिले होते. जयदीप आपटे हा कंपनीचा प्रोप्ररायटर आहे. तर डॉ. चेतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होता. हे दोघेही पुतळा दुर्घटनेला कारणीभूत ठरल्याचे दृष्टिक्षेपात आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अचानक कोसळला. या घटनेमुळे राज्य सरकार अडचणीत तर आलेच, शिवाय विरोधकांच्या हाती टीकेचे कोलीत मिळाले आहे. जागोजागी आंदोलने उभी राहिली आहेत. या पार्श्वभूमीवर जयदीप आपटे चर्चेत आला आहे. ज्याने शिवरायांच्या या पुतळ्याची उभारणी केली होती. जयदीप आपटेला फक्त दिड-दोन फुटांपर्यत पुतळे साकारण्याचा अनुभव आहे. असे असतानाही त्याला शिवरायांचा अवाढव्य पुतळा उभारण्याचे कंत्राट का देण्यात आले ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुतळा दुर्घटनेनंतर वादग्रस्त शिल्पकार जयदीप आपटेबद्दल काही माहिती हाती आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी राजकोट किल्ल्यावर करण्यात आले होते. मात्र अवघ्या आठ महिन्यांत पुतळा कोसळल्या प्रकरणी ठेकेदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट डॉ. चेतन पाटील यांची नावे पुढे आली आहेत. या दोघांच्या विरोधात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 109, 110, 125, 318 आणि 3 (5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. नौदल दिनी अनावरण करण्यात आलेला हा पुतळा सिंधुदुर्गवासियांसह शिवप्रेमींना समर्पित करण्यात आला होता. भारतीय नौदलाने सोमवारी एक निवेदन प्रसिद्ध करून घटनेच्या कारणांचा शोध घेण्याचे आश्वासन दिले आहे. पुतळा उभारणीसाठी महाराष्ट्र सरकारने नौदलाला 2 कोटी 36 लाख रूपये निधी दिला. कलाकारांची निवड, त्याचे डिझाईन ही सर्व प्रक्रिया नौदलाच्या अधिकाऱ्यांनी केली. 8 सप्टेंबर 2023 रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली होती.

जयदीप आपटे या कल्याणकर शिल्पकारावर राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा 28 फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा उभारण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. इतका मोठा पुतळा बनवण्यासाठी साधारणत: 3 वर्षांचा कालावधी लागत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तथापी हा पुतळा अवघ्या सात महिन्यांत उभारून पूर्ण करण्यात आला. यापूर्वी अशी भव्य शिल्पे बनवण्याचा जयदीपला विशेष अनुभव नव्हता. गेल्या वर्षी जून महिन्यात हा पुतळा बनवण्यास सुरूवात झाली. तर डिसेंबर 2023 पर्यंत या पुतळ्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती दस्तुरखुद्द जयदीप आपटे याने स्वत: एका मुलाखतीत दिली होती.

पुतळा उभारण्यापूर्वी जयदीप आपटे याला फक्त दीड ते दोन फुटांचे पुतळे साकारण्याचा अनुभव होता. जयदीपने स्वत:च एका मुलाखतीत याबद्दलची माहिती दिली होती. त्यामुळे इतका कमी अनुभव असलेल्या शिल्पकाराला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे कंत्राट कसे काय देण्यात आले ? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. दुर्घटनेनंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी करणारा कल्याणकर वादग्रस्त शिल्पकार जयदीप आपटे हा कोण ? याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे

वादग्रस्त शिल्पकार आरोपीच्या पिंजऱ्यात

कल्याण पश्चिमेकडील दूध नाका परिसरातील डॉ. गुप्ते चौकात असलेला बालाजी दर्शन इमारतीच्या बी विंगमधील 2 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये राहणारा जयदीप आपटे हा मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंपनीचा प्रोपरायटर आहे. कल्याणमधील त्याच्या शाळेच्या रस्त्यावरच शिल्पकार सदाशिव साठे यांचा स्टुडिओ आहे. त्यांच्या प्रभावामुळे आठव्या इयत्तेत शिकत असतानाच जयदीपने कला क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे मूळ गाव कल्याण असून आई-वडील दोघेही नोकरी करतात. जयदीप आपटेचे दहावीपर्यंतचे शिक्षण सुभेदार वाडा हायस्कूलमध्ये झाले. रहेजा स्कूल ऑफ आर्टमधून कमर्शियल आर्टची पदवी घेतल्यानंतर त्याने जे जे स्कूल ऑफ आर्टमधून शिल्पकलेचा डिप्लोमा केला आहे. त्यानंतर त्याने मेसर्स आर्टीस्ट्री नावाने कंपनी स्थापन करून शिल्पे तयार करण्याची कामे सुरू केली. मात्र शिवरायांचा पुतळा दुर्घटनेनंतर हाच शिल्पकार नुसता वादाच्या भोवऱ्यात सापडला नसून त्याला आता जनतेच्या तसेच न्यायालयातील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे रहावे लागले आहे.

केंद्रीय माजी मंत्र्यांकडून कौतुक

फेसबुक वॉलवरून मिळालेल्या माहितीनुसार शिल्पकार जयदीप आपटे याची तत्कालीन केंद्रित राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणच्या दूधनाका येथील स्टुडिओत भेट घेतली. तसेच त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कार्याविषयी माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारलेला पुतळा जयदीप याने साकारला होता. कल्याणच्या खडकपाडा चौकातील सिंहाचे शिल्पही घडविले असून त्याने सिडनी व लंडनमध्येही पुतळे पाठविले आहेत. कल्याण शहराचे भूषण असल्याचे संबोधून जयदीप आपटे याचे कपिल पाटील यांनी 21 फेब्रुवारी रोजी त्यांच्या फेसबुक वॉलवर टाकलेल्या पोस्टच्या माध्यमातून कौतुक केले. तर आमदार नितेश राणे यांनी देखील त्याचा सत्कार केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news