

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये आणि शाळेच्या ५० मीटर परिसरात अधिक चरबी, अधिक मीठ आणि अधिक साखर (एचएफएसएस) असलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीवर निबंध घातल्यानंतर शाळांच्या कॅन्टीनसमोर मेन्यू बदलण्याचे मोठे आव्हान असणार आहे. मुंबईतील अनेक शाळांच्या परिसरात सकाळी आणि दुपारच्या सुट्टीच्या वेळी वडापाव, समोसा पाव, सँडविच, मोमो, चायनीज भेळ, ब्रेड रोल आदी पदार्थ विकणाऱ्या हातगाड्या आणि स्टॉलवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते.
नव्या निर्बंधांमुळे अशा स्टॉलधारकांनाही पर्यायी पदार्थ ठेवावे लागण्याची शक्यता आहे. मात्र, निर्बंध केवळ शाळेच्या ५० मीटर परिसरापुरते असल्याने त्यापलीकडील विक्रीवर त्याचा कितपत परिणाम होईल, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. वडापाव, समोसा पाव, बर्गर, मोमो, मंचुरियन, चिप्स, केक, पेस्ट्री, कुकीज आदी पदार्थ सध्या बहुतांश शाळांच्या कॅन्टीनमधील प्रमुख विक्रीचे पदार्थ आहेत. त्यामुळे या पदार्थांच्या जागी कोणते पर्याय उपलब्ध करून द्यायचे, याबाबत शाळा प्रशासन आणि कॅन्टीन चालकांना आता कसरत करावी लागणार आहे.
नव्या आदेशानुसार शाळांमधील कॅन्टीन, मध्याह्न भोजन केंद्र, वसतिगृहातील स्वयंपाकघर तसेच शाळांना अन्नपुरवठा करणाऱ्या संस्थांना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाचा (एफएसएसएआय) परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणांची वर्षातून दोन वेळा तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे केवळ खाद्यपदार्थ बदलण्यापुरतेच नव्हे, तर अन्नसुरक्षेच्या निकषांचे पालन करण्याची अतिरिक्त जबाबदारीही शाळांवर येणार आहे. विलेपार्ले येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, कॅन्टीनमधून जंकफूड काढणे शक्य असले, तरी त्याऐवजी विद्यार्थ्यांना कोणते पदार्थ द्यावेत, याचे स्पष्ट नियोजन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना आवडतील आणि पोषणमूल्यही राखतील, अशा पदार्थांची निवड करावी लागणार आहे. यासंदर्भात आम्ही शनिवारी बैठक घेणार आहोत.
याच शाळेतील विद्यार्थ्यांनी हा निर्णय
आरोग्यासाठी योग्य असल्याचे सांगितले, तर वडापाव किंवा समोसा यांसारख्या सहज उपलब्ध आणि परवडणाऱ्या पदार्थांना पर्याय काय असेल, असा प्रश्न उपस्थित केला. अनेक विद्यार्थ्यांना दररोज डबा आणणे शक्य होत नसल्याने कॅन्टीन किंवा शाळेबाहेरील स्टॉल हा पर्याय असतो. त्यामुळे नव्या नियमांनंतर उपलब्ध होणाऱ्या पदार्थांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
कॅन्टीनच्या नव्या मेन्यूमध्ये पोहे, उपमा, थालिपीठ, घावने, इडली, उकडलेले कडधान्य, फळे, ताक, लस्सी, अंकुरित धान्यांचे पदार्थ अशा आरोग्यदायी पर्यायांचा समावेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, हे पदार्थ विद्यार्थ्यांकडून कितपत स्वीकारले जातात आणि त्यांची किंमत परवडणारी ठेवता येते का, यावर नव्या धोरणाच्या अंमलबजावणीचे यश