

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणीबाग) येथे करोडो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचा पडदा उघडण्यासाठी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच वेळ मिळाली. आता शुक्रवार ३१ जुलैला या नाट्यगृहाचा पडदा उघडणार आहे. या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावे, यासाठी महापालिका २०२१ पासून प्रयत्नशील होती. परंतु दोन मुख्यमंत्र्यांचा वेळच मिळाला नाही. त्यामुळे नाट्यगृहाचे लोकार्पण तब्बल ५ वर्षे रखडले.
राणीबागेमध्ये १९६३ मध्ये ४५० प्रेक्षकांसाठी खुले नाटयगृह महापालिकेने सुरु केले. पण नाट्यगृहातील आवाजाने राणीबागेतील प्राणी दचकत असल्याने १९८४ मध्ये हे खुले नाटयगृह बंद करण्यात आले. त्यानंतर नाट्य रसिकांच्या आग्रहाखातर हे नाट्यगृह तब्बल ३० ते ३५ कोटी रुपये खर्च करून बंदिस्त केले.
२०२१ मध्ये या नाट्यगृहाचे काम पूर्ण झाले. या नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण देण्यात आले होते. पण ठाकरे यांना या नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी वेळ मिळाला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु त्यांनाही लोकार्पणसाठी वेळ मिळाला नाही.
अखेर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नाट्यगृहाच्या लोकार्पणला वेळ दिला. त्यांच्या हस्ते ३१ जुलैला नाट्यगृहाचा पडदा उघडणार आहे.
नव्या नाट्यगृहात पालिका सभागृह
कोरोना काळात महापालिका मुख्यालयातील सध्याच्या महापालिका सभागृहात बैठका घेणे शक्य नव्हते. त्यामुळे अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेचे सभागृह अनेकदा भरले होते. त्याशिवाय काही कार्यक्रमही या नाट्यगृहात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गिरणगावकरांना मिळणार नाट्यगृह
गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबाग, काळाचौकी, माझगाव, परळ या मराठी लोकवस्तीत दामोदर नाट्यगृह वगळता एकही नाट्यगृह नव्हते. आता दामोदर नाट्यगृहही पाडण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील नाट्य रसिकांना शिवाजी पार्क अथवा उपनगरातील नाट्यगृहात जावे लागत होते. आता जवळच नाट्यगृह उपलब्ध होणार आहे. ७६१ आसने असलेल्या या नाट्यगृहासह भव्य रंगमंच, आधुनिक अकॉस्टिक साऊंड सिस्टीम, पुश बँक खुर्चा, प्रकाशयोजना, ग्रीन रूम, पुरेशी मोकळी जागा सोडण्यात आली आहे.
नाट्यगृहातील अन्य व्यवस्था
तळघरात सुमारे ३२ वाहने उभी करण्याची क्षमता
पहिल्या मजल्यावर प्रेक्षकांसाठी उपाहारगृह
नाट्यगृहात क्रायरूम (लहान बाळांसाठीची खोली)
ग्रीन रुम्स, दोन मेकअप रुम्स
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मृतिदालन