

मुंबई : कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी, त्यांची कन्या आणि चिक्कोडीच्या काँग्रेस खासदार प्रियंका जारकीहोळी यांच्याशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासाचे धागेदोरे मुंबईच्या पवईपर्यंत पोहोचले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील तब्बल १८ ठिकाणी एकाचवेळी झाडाझडती घेतली.
‘ईडी’च्या पथकांनी सतीश जारकीहोळी यांचे बंगळूरमधील डॉलर्स कॉलनीतील निवासस्थान, प्रियंका जारकीहोळी यांच्याशी संबंधित परिसर तसेच जारकीहोळी यांचे मेहुणे व कर्नाटक उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी वाय. डी. मंजुनाथ यांच्याशी संबंधित ठिकाणांवरही कारवाई केली.
‘ईडी’चा तपास कर्नाटकातील १८ बार परवान्यांच्या कथित गैरव्यवहाराभोवती केंद्रित असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. परवाने मिळवून देण्यासाठी प्रभावाचा वापर झाला का, त्यातून बेकायदेशीर पैसा निर्माण झाला का आणि या पैशाचा पुढे कसा वापर करण्यात आला, याचा तपास ‘ईडी’ करीत आहे. या कथित गैरव्यवहारातून मिळालेला पैसा परदेशात पाठविण्यात आला का, याचाही तपास सुरू आहे. यापूर्वीच्या तपासात सुमारे तीन कोटी रुपयांच्या संशयित परदेशी निधीचा माग लागल्याचे सूत्रांनी सांगितले.
मंजुनाथ यांच्यावरील तपासापेक्षा वेगळे प्रकरण
जारकीहोळी यांच्या ठिकाणी सुरू असलेली सध्याची कारवाई ही मंजुनाथ यांच्यावरील यापूर्वीच्या उत्पादन शुल्क प्रकरणाशी थेट जोडलेली नसून जारकीहोळी यांच्याशी संबंधित स्वतंत्र तपासाचा भाग असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, मंजुनाथ यांच्याशी संबंधित ठिकाणांचाही सध्याच्या शोधमोहिमेत समावेश आहे. ‘ईडी’च्या पथकांकडून झाडाझडतीदरम्यान मिळणारी कागदपत्रे, बँक व्यवहार, डिजिटल उपकरणांमधील माहिती आणि कंपन्यांशी संबंधित नोंदी तपासल्या जाणार आहेत. त्यातून बार परवाना, कथित बेकायदेशीर निधी आणि परदेशी व्यवहार यांच्यातील आर्थिक साखळी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पवईतील कारवाई महत्त्वाची का?
पवई येथे ‘ईडी’च्या पथकाने संबंधित आर्थिक व्यवहारांशी निगडित कागदपत्रे व अन्य नोंदींची तपासणी केल्याची माहिती आहे. मात्र, पवईच्या ठिकाणाहून किती रोकड, सोने, मालमत्तेची कागदपत्रे किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली, याचा अधिकृत तपशील अद्याप ‘ईडी’ने जाहीर केलेला नाही.
दक्षिण आफ्रिकेतील गुंतवणुकीचाही तपास
जारकीहोळी यांच्या कुटुंबातील लक्ष्मी आणि त्यांचा मुलगा राहुल यांच्याशी संबंधित दक्षिण आफ्रिकेतील लोहखनिज व्यवसायातील गुंतवणुकीकडे ‘ईडी’चे लक्ष आहे. या परदेशी गुंतवणुकीचा एकूण आकडा सुमारे ७२० कोटी रुपये असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
छापे राजकीय हेतूने प्रेरित : मुख्यमंत्री - मंत्री जारकीहोळी यांच्या निवासस्थानांवर ‘ईडी’ने याआधीही छापे टाकले होते. ते व्यावसायिकही आहेत. भाजप राजकीय फायद्यासाठी केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत आहे. ‘ईडी’चे छापे राजकीय हेतूने डोळ्यांसमोर ठेवून टाकलेले आहेत.
डी. के. शिवकुमार (मुख्यमंत्री)
भाजपकडून ‘ईडी’, प्राप्तिकरचा गैरवापर : ‘ईडी’ व प्राप्तिकर खात्यासारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करून भाजप विरोधी पक्षांतील अनुसूचित जमातीच्या (एसटी) नेत्यांना लक्ष्य करत आहे. भाजप आम्हाला धमकावण्यासाठी हे करत आहे. जारकीहोळी यांच्या भाजपचे आमदार असलेल्या भावांच्या निवासस्थानावर छापा का टाकला नाही.
बी. के. हरिप्रसाद (काँग्रेस प्रदेशाध्यक्ष)