

Sanjay Raut On Shinde: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि, १७ डिसेंबर) पत्रकार परिषद घेत लवकरच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आघाडीची घोषणा करतील. जागा वाटपाची बोलणी ही अंतिम टप्प्यात आली असून शेवटचा हात मारायचा बाकी आहे. एक दोन दिवसात यााबबत तुम्हाला अपेक्षित असलेली मोठी घोषणा होईल असं सांगितलं. याचबरोबर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर देखील जहरी टीका केली. त्यांनी एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा अमित शहांची टेस्ट ट्यूब बेबी आहे असं वक्तव्य केलं. याचबरोबर त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा १९ डिसेंबरला मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता असल्याच्या दाव्यावर देखील भाष्य केलं आहे.
संजय राऊत यांनी आजच्या सकाळच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आघाडीची घोषणा येत्या दोन दिवसात करतील असं सांगितलं. ते म्हणाले, 'आमच्यात कोणताही विसंवाद नाही. आमचं घर दोघांचं आहे. काँग्रेसच्या बाबातीत बोलायचं झालं तर त्यांना त्यांचं स्वबळ दाखवायचं आहे. आमची शरद पवार यांच्यासोबत देखील चर्चा सुरू आहे. मी शरद पवार यांना दोन दिवसात भेटणार आहे. मुंबईत शिवसेना अन् मनसे हे दोन प्रमुख पक्ष आहेत.'
राऊत पुढे म्हणाले, ही आमची आघाडी सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभं करेल. तसेच राऊतांनी आघाडी होणार का दोघे एकत्र येणार का याबाबत बोलताना उद्धव अन् राज कितीवेळा तरी एकत्र आले आहेत. एकमेकांच्या घरी गेले आहेत. चर्चेला बसले आहेत. यापेक्षा वेगळं एकत्र येणं काय असतं.'
राऊत यांनी शक्तीप्रदर्शनाबाबत देखील वक्तव्य केलं. ते म्हणाले शक्तीप्रदर्शन होईल मात्र त्याची तशी गरज नाही. ज्यावेळी पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल त्यावेळी मुंबईतील मराठी माणसाची गर्दी ओलंडून वाहेल.
शिवाजी पार्क येथील सभेवरून शिंदे गट अन् शिवसेना यांच्यातील स्पर्धेबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, 'यांना आता बुडबुडे आले आहेत. शिंदेंचा शिवतीर्थाशी काय संबंध आहे. अमित शहांनी पक्ष तुमच्या ताब्यात दिला म्हणजे पक्ष तुमचा होत नाही. तुम्ही अमित शहा यांची टेस्ट ट्यूब बेबी आहात. निवडणूक आयोगाच्या मदतीनं तुमचा जन्म झाला आहे.'
संजय राऊत पुढे म्हणाले, मनसे आणि आमची मागणी ही नैतिकदृष्ट्या योग्य आहे. जागा शिंदे गट अन् भाजप यांच्या जागावाटपाबाबत संजय राऊत म्हणाले, अजून ते टप्पा टप्पा खेळत आहेत. त्यांना टप्प्यातच राहू द्या.
शिंदेची शिवसेना अन् भाजप एकत्र आलेत हे अमित शहा यांनी लादलेलं लग्न आहे. मिंद्यांना काही करून भाजपच्या चरणाशी बसायचं आहे.'
संजय राऊतांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सभा मुंबईबाहेर महाराष्ट्रात देखील होतील असे सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी प्रकाश अंबेडकर यांना त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत शुभेच्छा दिल्या. ते जातीयवादी अन् धर्मांध शक्तीविरूद्ध शिवसेना मनसे लढू शकते याची कल्पना आमच्या दलित बांधवांना आहे. दलित बंधू आमच्या सोबत आहेत हे सांगायलाही विसरले नाहीत.
भाजप अन् राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील न होणाऱ्या युतीबाबत संजय राऊत यांनी हे सगळं भाजपचं नाटक असल्याच सांगितलं. नवाब मलिकांची मुलगी सरकारला पाठिंबा देते. मग ते आता का चालत नाहीत. नवाब मलिक हा अजित पवार यांचा अंतर्गत प्रश्न आहे. भाजपनं हे ढोंग करू नये असे राऊत म्हणाले.
शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाचे नेते सतत अमित शहा यांची भेट घेत असल्याबाबद्दल देखील राऊत यांनी टोला हाणला. ते म्हणाले, 'अमित शहा यांना मिंदे भेटतात ते त्यांच्या पक्षप्रमुखाला भेटतात. कृष्ण मेनन रोडवरील हिरळीवर बसून येतात त्यांच्या पांढऱ्या पँटला गवत लावून येतात.
संजय राऊत यांनी निवडणूक आयोग आणि न्यायालयावर देखील टीका केली. मात्र ही टीका करताना त्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले. घटनेच्या १० व्या शेड्युलनुसार फुटून गेलेल्या ४० आमदारांना अपात्र ठरवायला हवं मात्र निवडणूक आयोगानं तसं केलेलं नाही. कायदा यांच्या कोठीवर नाचतोय असं देखील राऊत म्हणाले.
याचबोरबर राऊत यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दाव्यावर देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, अमेरिकेतून १९ तारखेला काही गौप्यस्फोट होऊ शकतो. एप्स्टिन फाईलची कागदपत्रे उघड होणार आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या काही नेत्यांबाबत मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.
पृथ्वीराज चव्हाण हे सांगत असतील तर ते खरंच असेल. त्यांना खूप अनुभव आहे. अमित शहांना १०२ ताप आल्याचं कळतंय. १९ तारखेला मोठं काहीतरी होणार आहे. म्हणूनच भाजपच्या सर्व खासदारांना दिल्लीत थांबवण्याचा व्हीप निघाला आहे.