ठाकरे-फडणवीस भेटीच्या बातम्या म्हणजे स्वप्नरंजन
मुंबई : मविआत काँग्रेस आणि ठाकरे गटात जागावाटपावरून रण पेटलेले असतानाच सोमवारी काही वृत्तवाहिन्यांनी काँग्रेस सूत्रांचा हवाला देत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली, संजय राऊत यांनीही दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्याचे वृत्त प्रसारित केले. ठाकरे गटाचे खासदार राऊत यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. (Maharashtra Assembly Polls | Sanjay Raut)
स्वप्नरंजन करणार्या अशा बातम्या कोणी दिल्या, कुणी पसरवल्या याची बित्तंबातमी आमच्याकडे आहे, असा दावा करत शिवसेना कधीच महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही, असे खा. राऊत म्हणाले. या बातम्या हास्यास्पद असून काँग्रेस नेत्यांचा खरोखरच तसा दावा असेल तर मला त्यांचेही आश्चर्य वाटते. हे षड्यंत्र आहे. यात काहीजणांचा सहभाग असू शकतो. स्वत:च्या स्वार्थासाठी आमच्या स्वाभिमानावर शिंतोडे उडवणारे हे लोक आहेत. त्यांनी समोर येऊन लढावे. खोट्या बातम्या आणि अफवा पसरवून कोणी लढणार असतील तर त्यांना महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.
महाराष्ट्रात आम्ही एकत्रच
काँग्रेससोबत जागांचा पेच सुटला नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याचा विचार करीत आहे काय, यावर ते म्हणाले, वृत्तवाहिन्यांना हव्या असलेल्या बातम्यांसाठी सुरू झालेला हा विचार आहे. त्याला काही लोक खतपाणी घालत आहेत. महाराष्ट्रात आम्ही एकत्र आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Assembly Polls | Sanjay Raut)

