Maharashtra Assembly Polls 2024 | राजू शेट्टी यांची अस्तित्वाची लढाई

राजकीय ताकद निर्माण करू शकले तर शेतकर्‍यांच्या चळवळीला येणार बळ
Maharashtra Assembly Polls 2024
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीFile Photo
Published on
Updated on
चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर : Maharashtra Assembly Polls 2024 | महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटप अंतिम टप्प्यात आले असतानाच परिवर्तन आघाडीने या दोघांना पर्याय देण्याचा निर्धार पुण्यातील बैठकीत व्यक्त केला. महायुती आणि महाविकास आघाडी विरुद्ध परिवर्तन आणि वंचित बहुजन विकास आघाडी अशी चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. मात्र, या सगळ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना आपले अस्तित्व शोधावे लागत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे, प्रहारचे बच्चू कडू, मूळ शेतकरी संघटनेचे वामनराव चटप आणि भारत राष्ट्र समितीचे शंकरराव धोंडगे यांचा समावेश असलेली परिवर्तन आघाडी राज्यात विधानसभेची निवडणूक लढविणार आहे. त्यांच्यात 150 जागा लढविण्यावर मतैक्य झाले असून अन्य जागांवर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, या सगळ्या घडामोडीत राजू शेट्टी यांचे नेमके स्थान काय, असा प्रश्न विचारला जात आहे. साखर पट्ट्यात राजू शेट्टी यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून यश मिळविले आणि राजकीय कारकीर्द सुरू केली. या सदस्यपदाची मुदत संपण्यापूर्वीच ते आमदार झाले आणि आमदार पदाची मुदत संपण्यापूर्वी ते खासदारही झाले. सलग दुसर्‍यांदा त्यांना खासदार म्हणून संधीही मिळाली. 2014 मध्ये शिवसेना - भाजप युतीचा बाहेरून पाठिंबा घेऊन शेट्टी खासदार झाले. इचलकरंजीत त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभाही घेतली होती. भाजपचे राज्यातील वजनदार नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेट्टी यांच्याशी सलोख्याचे संबंध कायम ठेवले. यातूनच जेव्हा फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सत्तेचे मानाचे पान देण्यात आले. एक राज्यमंत्रिपद आणि राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले महामंडळाचे अध्यक्षपद संघटनेला देण्यात आले. (Maharashtra Assembly Polls 2024)

सत्तेच्या पदावर न जाता शेट्टी यांनी आपले विश्वासू सहकारी सदाभाऊ खोत यांचे नाव राज्यमंत्रिपदासाठी सुचविले. ते कृषी राज्यमंत्रीही झाले तर रविकांत तुपकर यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष झाले. मंत्रालयातील ज्या निर्णयाविरुद्ध शेट्टी यांनी मंत्रालयाच्या दारात संघर्ष केला त्याच मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनात शेट्टी यांचा फोटो लावण्यात आला. सत्तेतील सहभागाचे हे प्रतीक होते. मात्र पुढे शेट्टी आणि खोत यांचे बिनसले. खोत यांनी आपल्या दालनातील शेट्टी यांचा फोटो हटविला आणि स्वतःची संघटना उभी केली. येथूनच ते फडणवीस यांच्या अधिक जवळ गेले. पुढे रविकांत तुपकर यांनी सवता सुभा उभारला. त्यामुळे शेट्टी यांच्या संघटनेत अशी फूट पडली.

स्थान निर्माण करावे लागणार

आज राजू शेट्टी अस्तित्वासाठी झगडत आहेत. ज्यांना पदे दिली ते त्यांच्यापासून दूर गेले. एवढेच नव्हे तर त्यांनी आपली तलवार शेट्टी यांच्या विरुद्धच उपसली. हे करताना ते शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेतून बाहेर पडून शेट्टी यांनी सवता सुभा उभा केला. मग आमचे काय चुकले, असा बिनतोड सवाल विचारत आहेत. या सगळ्या राजकारणाच्या गदारोळात आता शेट्टी यांना स्वतःचे स्थान निर्माण करावे लागणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांना टक्कर देताना नव्याने सैनिक गोळा करून लढा द्यावा लागेल. राजू शेट्टी आणि लढा हे वेगळे नाही. मात्र, आता अस्तित्व टिकविण्याची वेळ आली आहे. संभाजीराजे, बच्चू कडू, शंकरराव धोंडगे, वामनराव चटप यांसारख्या मंडळींबरोबर राहून शेट्टी जर आपली राजकीय ताकद निर्माण करू शकले तर शेतकर्‍यांच्या चळवळीला बळ येईल. (Maharashtra Assembly Polls 2024)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news