Maharashtra Assembly Polls | काँग्रेस-राष्ट्रवादीतील वादावर चर्चेतून पडदा

दोन दिवसांत जागावाटप; चेन्नीथला यांची ग्वाही
Maharashtra Assembly Polls:
महाविकास आघाडीfile photo
Published on
Updated on

मुंबई : महाविकास आघाडीत कोणतेच मतभेद नाहीत. आघाडीतील जागावाटप दोन दिवसांत पूर्ण होऊन त्याची आम्ही घोषणा करू, अशी ग्वाही काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात निवडणूक जाहीर झाल्यापासून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आहेत. आम्ही सर्व एकजुटीने भाजपविरोधात लढून सत्तेतील भ्रष्ट सरकारला हद्दपार करून महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीतील जागावाटपावरून काँग्रेस व ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये असलेल्या वादावरून या दोन पक्षांमध्ये ठिणगी उडाली होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने टोकाची भूमिका घेतल्याने या आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला होता. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातही वाद सुरू होता. मात्र, चेन्नीथला यांच्या वक्तव्यानंतर वादावर पडदा पडला असल्याचे मानले जात आहे.

चेन्नीथला यांनी मुंबईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, आमदार भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित होते. आघाडी स्थापन करून एकत्र निवडणूक लढवायची असते तेव्हा जागावाटपावर चर्चा होतच असते. आमची चर्चा दोन दिवसांत पूर्ण होईल. आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे महाविकास आघाडीला सक्षम बनविण्यासाठी काम करीत आहेत. त्यांचे मत विचारात घेऊनच आम्ही पुढे जाऊ आणि आम्ही मिळून एकत्र काम करणार आहोत, असेही चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, लवकरात लवकर उमेदवार यादी जाहीर व्हावी, अशी अपेक्षा आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांत मतभेद नाहीत. आघाडीच्या राजकारणात एखाद्या जागेवरून चर्चा वाढत असते. शुक्रवारीही दिवसभर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जयंत पाटील आणि आम्ही चर्चेला बसलो होतो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्यातील बरेचसे पेच सुटले आहेत. शेवटी एकत्र बसून गुंता सोडवण्याची मानसिकता लागते, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडणुकीनंतर

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता चेन्नीथला म्हणाले, महाविकास आघाडीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरच आम्ही पुन्हा एकत्र बसून कोण मुख्यमंत्री बनणार, याचा निर्णय घेऊ. सध्या महाविकास आघाडीला बहुमत मिळावे हेच आमचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सर्व पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत, असे चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news