

Sanjay Raut On Maharashtra Financial Situation : लाकडी बहिण योजना, कौशल्य विकास आणि एसआरए योजनेमुळे राज्यावर ९ लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये २४ हजार कोटींचे कर्ज घेतले गेले आहे. राज्य कर्जबाजारी होत आहे. राज्याची आर्थिक अवस्था नेपाळसारखी झाली आहे, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि.१६) माध्यमांशी बोलताना केला.
यावेळी राऊत म्हणाले की, राज्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. गेल्या तीन महिन्यांत २४ हजार कोटींचे कर्ज घेतले गेले आहे. म्हणूनच आम्ही म्हणतो की, राज्याची आर्थिक स्थिती नेपाळसारखी झाली आहे. आम्ही नेपाळचा संदर्भ दिला की, ते आम्हाला माओवादी ठरवतात. नेपाळही असाच लुटला गेला. आर्थिक असंतोषातूनच नेपाळची जनता रस्त्यावर उतरली आणि सरकारविरोधात बंड केले.
राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचार हा मंगलप्रभात लोढा यांच्या कौशल्य विकास खात्यात होतो आहे. कौशल्य विकासाच्या नावाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटले जात आहेत, असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला. ९ लाख कोटी रुपयांचे कर्ज कोणामुळे झाले? राज्याच्या तिजोरीत येणारा पैसा कोणाच्या खिशात जातोय? असा सवालही त्यांनी केला.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे नेहमीच आर्थिक शिस्तीवर बोलत असतात. आता एकीकडे राज्यावर कर्जाचा बोजा वाढत असताना, अजित पवार गप्प का आहेत? असा सवालही संजय राऊत यांनी केला.
राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी आपले जीवन संपवत आहेत. एकीकडे राज्य सरकार कर्ज घेते; मग हे पैसे कोणाच्या खिशात गेले? लाकडी बहिण योजना, कौशल्य विकास आणि एसआरए योजनेमुळे राज्यावर ९ लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. गेल्या तीन महिन्यांत २४ हजार कोटींचे कर्ज घेतले गेले आहे.आता शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहेत. सरकारने आणखी एक लाख कोटी रुपये कर्ज घेऊन राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, असे आवाहनही संजय राऊत यांनी केले.