

सातारा: खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्यावर त्यांच्या 'भाजपचा हस्तक' या टीकेवरून जोरदार पलटवार केला आहे. राऊत यांचं नाव न घेता उदयनराजे यांनी त्यांना खोचक टोला लगावला. त्याचबरोबर मराठा आरक्षणाबाबतही त्यांनी आपलं मत व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महत्त्वाची विनंती केली आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर उदयनराजे यांनी म्हटलं की, "मला कोणाचं नाव घेऊन त्यांना मोठं करायचं नाही. माझ्या मनात जे असतं, तेच माझ्या ओठावर असतं. मला सवंग प्रसिद्धी घ्यायची नसते." पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केलं, "जर कोणी मला भाजपचा हस्तक म्हणत असेल, तर ते त्यांच्या संकुचित बुद्धीचं लक्षण आहे. देव त्यांना सद्बुद्धी देवो, हीच प्रार्थना." यावेळी त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणण्याच्या प्रवृत्तीवरही टीका केली. "प्रत्येक विषयात राजकारण आणणं ही घातक प्रवृत्ती आहे," असं ते म्हणाले. "धर्म, जात, समाज कोणताही असो, मोठ्या आणि सकारात्मक विचारांनी पुढे गेलं पाहिजे."
संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिल्यानंतर उदयनराजे यांनी मराठा आंदोलनावरही आपली भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट केलं, "माझ्या पोटात असतं तेच माझ्या ओठात असतं. जे योग्य आहे, तेच मी योग्य म्हणत असतो." तब्येत बरी नसल्यामुळे आपण आंदोलनाच्या ठिकाणी जाऊ शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं. याआधी आपण अंतरवाली सराटीला गेलो होतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
उदयनराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांमधून विनंती केली की, "शासनाने लवकरात लवकर या आंदोलनावर तोडगा काढावा. जे आंदोलन करत आहेत, त्यांच्या प्रमुखांसोबत बोलून मार्ग काढावा." आपल्याला कालच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला असल्यामुळे आपण आंदोलनास्थळी येऊ शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं. मात्र, मुख्यमंत्र्यांसोबत आपलं अजून बोलणं झालेलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन केलं. त्याचबरोबर, आंदोलकांना आवश्यक मूलभूत सुविधा सरकारने पुरवाव्यात, असंही उदयनराजे यांनी म्हटलंय.